संक्षिप्त पुणे Print

लोहगड प्रतिष्ठानच्या वतीने लोकसत्ताच्या ‘ यशस्वी भव’ पुस्तिकेचे मोफत वितरण
लोणावळा येथील लोहगड प्रतिष्ठानच्या वतीने लोणावळा नगर पालिकेच्या पंडित नेहरू विद्यालयातील दहावीच्या विद्यार्थ्यांना लोकसत्ताच्या ‘दहावी अभ्यासक्रम यशस्वी भव’ पुस्तिकेचे मोफत वितरण माजी नगराध्यक्ष अरूण मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. सध्याच्या स्पर्धेत टिकण्यासाठी विद्यार्थी सर्वगुणसंपन्न असला पाहिजे. त्यासाठी बदलत्या शिक्षण पद्धती आणि शैक्षणिक साधनांशी त्याने समरस होणे आवश्यक आहे, असे मत मोरे यांनी या वेळी व्यक्त केले. या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते एम.बी.मोरे, ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत जोशी, अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे विभागीय सचिव व लोहगड प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रीराम कुमठेकर आदी उपस्थित होते.
सरव्यवस्थापकपदी पी.एन.देशपांडे  
महाबँकेचे पुणे विभागाचे सरव्यवस्थापक म्हणून पी.एन.देशपांडे यांनी नुकतीच सूत्रे स्वीकारली आहेत. यापूर्वी ते बँकेच्या गुजरात विभागात सरव्यवस्थापक पदी कार्यरत होते. त्यांनी बँकेच्या संचालक अधिकारी पदाची जबाबदारीही सांभाळली आहे. तसेच, त्यांना बँकेतर्फे ‘उत्कृष्ट अधिकारी’ म्हणून सन्मानित करण्यात आलेले आहे. बँकेची सेवा अधिकाधिक ग्राहकाभिमुख करण्यास प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.
हृद्गंध तर्फे पुस्तकाचे प्रकाशन
हृद्गंध तर्फे ‘कोलाज..शोध..व्यक्तीचा..अभिव्यक्तींचा’ या पुस्तकाचे प्रकाशन रविवारी २१ ऑक्टोबर रोजी करण्यात येणार आहे. या पुस्तकामध्ये विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवणाऱ्या  मिलिंद मुळीक, बाबासाहेब पुरंदरे, पंडित हृदयनाथ मंगेशकर, डॉ.मोहन धारिया, दिलीप प्रभावळकर, आदी २९ मंडळींच्या मुलखतींचा समावेश आहे. या पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ  व्यंग चित्रकार मंगेश तेंडुलकर व निवेदक सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी हृद्गंधच्या वतीने ‘कधी वाटते’ या स्वरचित गीतांचा व कवितांच्या कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे.
‘टुवर्ड्स लाईट’अंतर्गत विशेष व्याख्यानमाला
ज्ञानेश्वर मुळे एज्युकेशन सोसायटीतर्फे ‘टुवर्ड्स लाईट’ या उपक्रमांतर्गत  विशेष व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ‘लॉज, लिबर्टी अ‍ॅण्ड लाइव्हलीहूड’ या विषयाच्या माध्यमातून प्रा. मधू किश्वर यांनी पथारीवाले, रिक्षाचालक यांच्या समस्यांवर प्रकाश टाकला. आपल्या देशातील अव्यवहार्य कायद्यांमुळे पथारीवाले, फेरीवाले यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. तसेच, या समुदायाला त्यांची रोजीरोटी मिळवण्यासाठी देखील लाच द्यावी लागते, असेही मत किश्वर यांनी या वेळी व्यक्त केले. भारताचे मालदीवमधील उच्चायुक्त ज्ञानेश्वर मुळे, लक्ष्मीकांत देशमुख, कुलभूषण बिरनाळे आदी या प्रसंगी उपस्थित होते.
‘ईएमई’चा ६९ वा स्थापना दिवस साजरा
लष्कराच्या इलेक्ट्रॉनिक अ‍ॅन्ड मेकॅनिकल इंजिनीअरिंग (ईएमई) विभागाचा ६९ वा स्थापना दिवस नुकताच पुण्यात साजरा करण्यात आला. लष्कराशी संबंधित सर्व उपकरणांचे अनुरक्षण आणि सुसज्जता कायम राखण्यासाठी ‘ईएमई’ ने केलेले कठोर परिश्रम आणि समर्पणभाव याबद्दल दक्षिण क्षेत्राचे प्रमुखाधिकारी लेफ्टनंट जनरल ए.के.सिंग यांनी या वेळी प्रशंसोद्गार काढले. लष्कराची शस्त्रास्त्र यंत्रणा आणि उपकरणे यासाठी अभियांत्रिकी साहित्य पुरविण्यात ‘ईएमई’ चे मोठे योगदान आहे. काळानुरूप आधुनिक तंत्रज्ञानाशी सांगड घालणे आवश्यक आहे, असे मत मेजर जनरल संजीव खन्ना यांनी व्यक्त केले.
श्रीराम लागू यांना राजर्षी शाहू कला गौरव पुरस्कार
सातारा येथील भारतीय भटके विमुक्त विकास व संशोधन संस्थेच्या वतीने ज्येष्ठ अभिनेते श्रीराम लागू यांना ‘राजर्षी छत्रपती शाहू कला गौरव पुरस्कारा’ने गौरविले जाणार आहे. वीस हजार रुपये रोख, मानपत्र व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते १९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. डॉ.बाबा आढाव, डॉ.गो.पु.देशपांडे, डॉ.जब्बार पटेल, रिमा लागू आदी मान्यवर या वेळी उपस्थित राहणार आहेत.
‘अंतर्वेध’ला ‘कै.विद्याधर पुंडलिक साहित्य पुरस्कार’
महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे देण्यात येणारा ‘कै.विद्याधर पुंडलिक साहित्य पुरस्कार’ यंदा यशवंतराव गडाख यांनी लिहिलेल्या आणि ऋतुरंग प्रकाशनच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या ‘अंतर्वेध’ या व्यक्तिचित्रणात्मक लेखसंग्रहाला जाहीर झाला आहे. ‘अंतर्नाद’ मासिकाचे संपादक भानू काळे यांच्या शुभहस्ते १७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६.१५ वाजता एस.एम.जोशी सभागृहात या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे, अशी माहिती मसापचे प्रमुख कार्यवाह मिलिंद जोशी यांनी दिली.
उत्कर्ष लायब्ररीतर्फे सवलती
उत्कर्ष लायब्ररीतर्फे दिवाळी अंकांसाठी दोनशे रुपयांत लायब्ररीचे सभासदत्व उपलब्ध करून देण्यात आले आहे. नवीन सभासदांना उषा पुरोहित यांचे ‘मिठाई’ हे पुस्तक व एक दिवाळी अंक भेट देण्यात येईल. तसेच, शाळा, सार्वजनिक व खासगी ग्रंथालये, सहकारी गृह संस्था यांना २५ टक्के सवलतीच्या दरात दिवाळी अंक मिळतील. लहान मुलांसाठी फास्टर फेणे, शेरलॉक होम्स अशी पुस्तके खास सवलतीच्या दरात उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.