बेकायदा इमारत कोसळल्याच्या प्रकरणात फरार आरोपी अटकेत Print

प्रतिनिधी
तळजाई पठार येथील बेकायदा इमारत कोसळल्याच्या प्रकरणातील फरार आरोपी लहू ऊर्फ धिरेंद्र बापू सावंत (वय २९, रा. धनकवडी) यास सहकारनगर पोलिसांनी साताऱ्यातून मंगळवारी अटक केली. या प्रकरणात माजी नगरसेवक संजय नांदे याला पूर्वीच अटक केली आहे.
धनकवडी येथील तळजाई पठारावरील चार मजली बेकायदा इमारत गेल्या २४ सप्टेंबरला कोसळल्याने ११ जणांचा मृत्यू झाला होता. ही बेकायदा इमारत नांदे व सावंत यांच्या मालकीची असल्याने दोघांच्या विरुद्ध सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात नांदे याला अटक केली होती. मात्र, सावंत हा घटना घडल्यापासून फरार होता. सावंत हा साताऱ्यात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून व फोनच्या लोकेशनवरून त्याला मंगळवारी अटक करण्यात आली. सावंत हा नांदेकडे काम करत होता. नांदेच्या केबल नेटवर्कची कामे तो करत होता, अशी माहिती सहकारनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक कमलाकर ताकवले यांनी दिली.