लोणावळा लोकलच्या बदललेल्या वेळांमुळे प्रवाशांची संख्या घटली? Print

लोकलच्या वेळांबाबत पुनर्विचार करण्याची मागणी
प्रतिनिधी
पुणे- लोणावळा लोकलच्या बदललेल्या वेळापत्रकावर अनेक प्रवाशांकडून आक्षेप नोंदविण्यात येत असून, गरजेच्या वेळेला लोकल नसल्याने काही प्रवाशांना नाईलाजास्तव वाहतुकीचा इतर पर्याय निवडावा लागत असल्याने लोकलच्या प्रवाशांची संख्या काही प्रमाणात घटल्याचे बोलले जात आहे. लोकलच्या वेळा व नियोजनाबाबत पुनर्विचार करावा व वेळा पूर्वीप्रमाणे करण्यात याव्यात, अशी मागणी विविध संघटनांच्या वतीने रेल्वे प्रशासनाकडे करण्यात आली आहे.
पुणे- लोणावळा दरम्यान प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता नऊ डब्यांची लोकल बारा डब्यांची करण्यात आली. सध्या काही फेऱ्यांतील लोकलला तेरावा डबाही जोडण्यात आला आहे. त्याचप्रमाणे फेऱ्यांची संख्याही वाढविण्यात आली आहे. मागील काही वर्षांंमध्ये लोकलच्या प्रवाशांच्या संख्येमध्ये सातत्याने वाढ नोंदविली जात आहे. सुमारे दोन महिन्यांपूर्वी लोणावळा लोकलच्या वेळांमध्ये बदल करण्यात आला. काही लोकलच्या काही फेऱ्यांचे तळेगाव ते लोणावळा दरम्यानचे थांबे रद्द करण्यात आले. बदललेल्या वेळा व नव्या नियोजनाबाबत मात्र अनेक प्रवाशांकडून तक्रारी करण्यात येत आहेत.
पुणे- मुंबई रेल्वे प्रवासी संघाकडूनही याबाबत आक्षेप नोंदविण्यात आला आहे. संघटनेचे कार्याध्यक्ष हेमंत टपाले यांनी रेल्वे उपभोगता समितीच्या बैठकीतही रेल्वे अधिकाऱ्यांपुढे बदललेल्या वेळांमुळे प्रवाशांची होणारी गैरसोय निदर्शनास आणून दिली. प्रामुख्याने तळेगाव ते लोणावळा या पट्टय़ातील प्रवाशांची बदललेल्या वेळांमुळे मोठय़ा प्रमाणावर गैरसोय होत आहे. लोणावळ्याहून सुटणाऱ्या लोकल मुंबईवरून येणाऱ्या गाडय़ांना जोडून नसल्याने मुंबईहून तळेगावपर्यंत येणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होते. लोणावळ्यावरून रात्री सव्वा अकराची लोकल अर्धा तास उशिराने सोडण्यात आली आहे, ही वेळ गैरसोयीची आहे. काही फेऱ्यांना लोणावळा, तळेगाव दरम्यान थांबाच नसल्याने मधल्या स्थानकातील प्रवाशांना या लोकलचा लाभ मिळत नाही.
तळेगाव ते लोणावळा या पट्टय़ात वडगाव मावळ हे तालुक्याचे गाव आहे. या पट्टय़ात विविध महाविद्यालये, सरकारी कार्यालये, न्यायालय आदी ठिकाणी जाणारे प्रवासी मोठय़ा प्रमाणावर आहेत. त्याचप्रमाणे व्यापारी वर्गाची संख्याही मोठी आहे. सोयीच्या वेळेला लोकल नसल्याने महामार्गावरून इतर वाहनांचा पर्याय अनेकांना स्वीकारावा लागतो. त्यामुळे लोकलच्या प्रवाशांच्या संख्येवर परिणाम झाल्याचे बोलले जाते. कोणत्याही प्रवासी संघटनेशी चर्चा न करता वेळा बदलल्याचा आरोप होत असून, लोकलच्या वेळा पूर्वीप्रमाणेच ठेवाव्यात असा मागण्यांचे निवेदन मावळ तालुका पंचायत समिती कर्मचारी, वडगाल मावळ बार असोसिएशन, कान्हे ग्रामपंचायत, व्यापारी असोसिएशन यांच्या वतीने रेल्वे प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे.