स्थायी समितीच्या निर्णयाविरुद्ध नगरसेवकांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन Print

पुणे/प्रतिनिधी
पुणे महापालिकेच्या स्थायी समितीने मंजूर केलेला होर्डिगच्या परवानगीचा निर्णय होर्डिग व्यावसायिकांचा फायदा करणारा आणि महापालिकेचे कोटय़वधी रुपयांचे नुकसान करणारा असल्यामुळे या निर्णयाला त्वरित स्थगिती द्यावी तसेच मूळ धोरण मंजूर करावे, अशी मागणी काँग्रेससह शिवसेनेच्या नगरसेवकांनी आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे केली.
जाहिरात फलक आणि होर्डिगना तात्पुरती परवानगी देण्याच्या नावाखाली महापालिकेचे शेकडो कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान करणारा निर्णय स्थायी समितीमध्ये सोमवारी घेण्यात आला. महापालिका प्रशासनाच्या मूळ विषयपत्राला अनेक उपसूचना देऊन स्थायी समितीत अनेक निर्णय घेण्यात आले आणि महापालिकेचे नुकसान करणारे हे निर्णय सर्व पक्षांनी एकमताने मंजूर केले. आहेत.
या निर्णयाला काँग्रेसचे प्रदेश सचिव, नगरसेवक संजय बालगुडे, मुकारी अलगुडे तसेच शिवसेनेचे नगरसेवक प्रशांत बधे यांनी आक्षेप घेतला असून त्यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची मंगळवारी भेट घेऊन त्यांना या वादासंबंधीचे निवेदन सादर केले. माजी आमदार चंद्रकांत छाजेड यांचीही यावेळी उपस्थिती होती. महापालिकेच्या मुख्य सभेने सन २०१० मध्येच होर्डिग धोरण मंजूर केले असून अंतिम मंजुरीसाठी ते राज्य शासनाकडे प्रलंबित आहे. ते मंजूर झाले, तर महापालिकेचे उत्पन्न वार्षिक ८० ते ९० कोटी रुपयांनी वाढणार आहे. याच धोरणाला मंजुरी द्यावी यासाठी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह काही आमदारांनीही आग्रह धरला होता. तसेच या धोरणाची शिफारसही पवार यांनी केली होती. परंतु पुणे महापालिकेच्या स्थायी समितीने नुकताच चुकीचा निर्णय केला असून त्यात फक्त होर्डिग मालकांचे हित पाहण्यात आले आहे. या निर्णयात काहीतरी व्यवहार झाल्याचा संशय पुणेकर व्यक्त करत आहेत, अशी माहिती बालगुडे, अलगुडे आणि बधे यांनी मुख्यमंत्र्यांना दिली. ही परिस्थिती विचारात घेता शासनाकडे प्रलंबित असलेले धोरण आपण लवकरात लवकर मान्य करावे, अशीही विनंती मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.