डमी विद्यार्थी पुरविणाऱ्यांचे हात लांबच लांब! Print

* पुनर्मूल्यांकनही ‘मॅनेज’ केल्याचा संशय * आतापर्यंत सोळा विद्यार्थ्यांकडून पैसे घेतल्याचे उघड
* विद्यापीठाकडूनही चौकशी समिती स्थापन
प्रतिनिधी
डमी विद्यार्थी पुरविणाऱ्यांचे हात लांबच लांब असल्याचे तपासाद्वारे सष्ट झाले असून, हे ‘रॅकेट’ चालविणाऱ्यांनी डमी विद्यार्थी पुरविण्याबरोबरच विद्यापीठातील पुनर्मूल्यांकनही ‘मॅनेज’ केल्याची शक्यता आहे. पोलीसही त्या दृष्टीने तपास करत आहेत. दरम्यान, या टोळक्याने सोळा विद्यार्थ्यांकडून पैसे घेतल्याचे आतापर्यंतच्या तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विद्यापीठाकडूनही निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली चौकशी समिती नेमण्यात आली आहे.
पोलिसांनी एकत्रित कारवाई करून गौस शब्बीर शेख (वय ४०, रा. न्यू मोदीखाना, लष्कर) व डमी विद्यार्थी फरीद परवेझ सय्यद (वय २३, रा. मिठानगर, कोंढवा) यांना गेल्या आठवडय़ात अटक केली होती. गौसकडून २८ गुणपत्रिका व दहा हॉलतिकीट जप्त करण्यात आले होते. त्यानंतर पूना कॉलेजमध्ये कारकून असलेल्या सलीम माजीर शेख (वय ४२, रा. मिठानगर, कोंढवा) याला अटक केली. फरीद सय्यद याने यापूर्वी एका परदेशी विद्यार्थ्यांचा पेपर दिल्याचेही उघड झाले आहे. विद्यापीठाकडून महाविद्यालयांना नाव असलेले हॉलतिकीट दिले जाते. महाविद्यालय ते विद्यार्थ्यांनाच देऊन त्यावर फोटो चिटकवून सही व शिक्का घेण्यास सांगते. या हॉलतिकिटावर डमी विद्यार्थ्यांचा फोटो चिटकवून गौस हा गर्दीच्या वेळी सही व शिक्का घेण्यास पाठवत होता, हे तपासात उघड झाले आहे. या सर्व प्रकरणाचा तपास केल्यानंतर गौस व शेख यांच्याकडे सोळा विद्यार्थ्यांकडून पास करण्यासाठी पैसे घेतल्याचेही निषन्न झाले आहे. या प्रकरणात विद्यापीठातील परीक्षा विभागातील काही कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याचे दिसून आले असून त्यांची चौकशी करण्यात आली आहे, असे लष्कर ठाण्याच्या पोलिसांनी सांगितले.
विद्यापीठाकडून चौकशी समिती स्थापन
‘‘या प्रकाराची चौकशी करण्यासाठी निवृत्त सहायक पोलीस आयुक्त शरद अवस्थी यांच्या नेतृत्वाखाली तीन सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. या तपासात विद्यापीठाकडून पोलिसांना पूर्णपणे सहकार्य केले जाईल. त्यात सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांना विद्यापीठाकडून कोणत्याही प्रकारे सहकार्य केले जाणार नाही, तसेच निर्दोष व्यक्तींना कोणताही त्रास होणार नाही, याची विद्यापीठ प्रशासनाकडून पूर्ण खबरदारी घेण्यात येईल,’’ असे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी सांगितले.