ऐतिहासिक वास्तूंची ओळख करून देणाऱ्या फेरीचा प्रारंभ Print

प्रतिनिधी
alt

शनिवार वाडा ते विश्रामबाग वाडा दरम्यानच्या विविध ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वैभव लाभलेल्या वास्तूंची ओळख करून देणाऱ्या ‘हेरिटेज वॉक’ या उपक्रमाचे उद्घाटन मंगळवारी समारंभपूर्व करण्यात आले. महापालिका स्तरावर अशा प्रकारचा उपक्रम राबवणारी पुणे महापालिका ही देशातील पहिली महापालिका ठरली आहे.
पुण्यातील विविध वास्तूंचा आणि त्यांच्या जडणघडणीचा इतिहास, कलेच्या दृष्टीने या वास्तूंचे महत्त्व, तसेच लष्करीदृष्टय़ा असलेले या वास्तूंचे तत्कालीन महत्त्व, या वास्तूंची स्थापत्यरचना, पुण्याची तत्कालीन संस्कृती, इतिहास यांची ओळख करून देणारा ‘हेरिटेज वॉक’ हा उपक्रम पुणे महापालिकेने सुरू केला आहे. महापौर वैशाली बनकर यांनी मंगळवारी सकाळी शनिवार वाडय़ाच्या प्रवेशद्वारात या उपक्रमाचे उद्घाटन केले. महापालिका आयुक्त महेश पाठक, आमदार मोहन जोशी, हेरिटेज समितीचे अध्यक्ष डी. एन. मंडलेकर, तसेच अरुण फिरोदिया, जयश्री फिरोदिया, काँग्रेसचे शहराध्यक्ष अभय छाजेड, स्थायी समितीचे अध्यक्ष बाबुराव चांदेरे, उपमहापौर दीपक मानकर, शिक्षण मंडळाचे अध्यक्ष प्रदीप धुमाळ, भाजपचे गटनेता अशोक येनपुरे, नगरसेवक दिलीप काळोखे, माधुरी सहस्रबुद्धे यांच्यासह महापालिकेचे पदाधिकारी, नगरसेवक, अधिकारी आदींची या वेळी प्रमुख उपस्थिती होती.
महापालिकेने ‘जनवाणी’ या संस्थेला हा उपक्रम चालविण्यास दिला असून दर शनिवारी व रविवारी ही फेरी सकाळी सात वाजता महापालिका भवनाजवळील शिवाजी पुलाजवळून सुरू होईल आणि विश्रामबाग वाडय़ाजवळ नऊ वाजता त्याची सांगता होईल. या मार्गावरील अठरा ठिकाणे या पायी फेरीत दाखवली जाणार आहेत.
कार्यक्रमाच्या स्वागतपर प्रास्ताविकात संस्थेचे अजित आपटे यांनी उपक्रमाची माहिती दिली. या उपक्रमाच्या निमित्ताने पुण्यातील ऐतिहासिक वास्तूंचे जतन व संवर्धनही होणार आहे आणि असा उपक्रम राबवणारी पुणे महापालिका ही देशातील पहिली महापालिका ठरली आहे, असे ते म्हणाले. या कार्यक्रमाच्या सांगतेप्रसंगी विश्रामबाग वाडय़ात सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जाणार आहेत. शाहीर हेमंत मावळे यांनी अभंग, महाराष्ट्र गीत आणि पुण्याचा पोवाडा या वेळी सादर केला. महापालिकेच्या हेरिटेज सेलचे प्रमुख श्याम ढवळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.