हेलनची अदा आणि रसिक झाले फिदा Print

प्रतिनिधी
alt

 ‘पिया तू अब तो आजा’ या गीतावर हेलन यांनी अदा सादर करताच टाळ्या-शिट्टय़ांच्या साथीने रसिकदेखील फिदा झाले. ‘मला बोलण्याची भीती वाटते. माझे पायच बोलतात’ ही भावना व्यक्त करीत हेलन यांनी श्रोत्यांनाजिंकले. हेलन याच केंद्रिबदू असलेल्या पुणे नवरात्र महोत्सवाचे विविधरंगी कार्यक्रमांच्या सादरीकरणाने मंगळवारी उद्घाटन झाले.
पुणे नवरात्र महोत्सवाचे सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झाले. संगीतकार अजय-अतुल, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, लावणी नृत्यांगना रेश्मा मुसळे-परितेकर, नाटय़ अभिनेते चेतन दळवी आणि नाटय़ परिषद पुणे शाखेचे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई यांना लक्ष्मीमाता कला-संस्कृती पुरस्कार प्रदान करण्यात आला. खासदार सुरेश कलमाडी, माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील, आमदार माधुरी मिसाळ, शरद रणपिसे, मोहन जोशी, दीप्ती चवधरी, माजी आमदार उल्हास पवार, चंद्रकांत छाजेड, काँग्रेसचे शहराध्यक्ष अभय छाजेड, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष कमल व्यवहारे, ज्येष्ठ अभिनेत्री लीला गांधी, महोत्सवाचे संयोजक आबा बागूल आणि जयश्री बागूल याप्रसंगी उपस्थित होते.
रत्नाकर शेळके डान्स अ‍ॅकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी देवा ‘श्रीगणेशा’ गीतावर केलेले नृत्य, प्राजक्ता माळी हिने नृत्यातून साकारलेले देवीस्तवन, विनोद धोपटे यांनी साकारलेला गोंधळ, रेश्मा परितेकर हिने सादर केलेले लावणीनृत्य आणि ज्येष्ठ कथक नृत्यांगना शमा भाटे यांच्या शिष्यांनी सादर केलेले दुर्गास्तवन असे कार्यक्रम उद्घाटनापूर्वी झाले. अजय-अतुल यांनी पारितोषिकाच्या रकमेचे धनादेश ढोलकीवादक पांडुरंग घोटकर यांना दिले तेव्हा टाळ्यांच्या कडकडाटात त्यांना प्रतिसाद मिळाला. आबा बागूल यांनी प्रास्ताविक केले. सुधीर गाडगीळ यांनी सूत्रसंचालन केले. घनश्याम सावंत यांनी आभार मानले.