एसटीची शिवाजीनगर-शिर्डी ‘व्होल्वो’ सेवा आजपासून सुरू Print

प्रतिनिधी
शिर्डीसाठी वातानुकूलित व्होल्वोची सेवा सुरू करण्याचा निर्णय राज्य परिवहन महामंडळाच्या पुणे विभागाच्या वतीने घेण्यात आला असून, शिवाजीनगर-शिर्डी या मार्गावर व्होल्वो गाडीची सेवा गुरुवारपासून सुरू करण्यात येणार आहे.
एसटीच्या व्होल्वो वातानुकूलित गाडय़ांना दिवसेंदिवस मागणी वाढत आहे. सुरुवातीला पुणे-दादर या मार्गावर ही सेवा सुरू करून नंतर पुण्यातील पुणे स्टेशन, स्वारगेट, शिवाजीनगर स्थानकावरून विविध मार्गावर या गाडय़ांची सुविधा देण्यात आली आहे. त्यानुसार शिवाजीनगर स्थानकावरून व्होल्वोची सेवा सुरू व्हावी, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात आली होती.
प्रवाशांकडून करण्यात आलेल्या मागणीची दखल घेऊन गुरुवारपासून ही सेवा सुरू करण्यात येणार आहे. सुरुवातीला आठवडय़ातील दोन दिवस या गाडय़ा सोडण्यात येणार असून, प्रवाशांचा प्रतिसाद लक्षात घेता हा सेवेमध्ये वाढ करण्यात येणार आहे. सध्या शिवाजीनगरहून शिर्डीसाठी दर बुधवार व गुरुवारी सकाळी साडेआठ व साडेसहा या दोन गाडय़ा सोडण्यात येणार आहेत. शिर्डीहून गाडय़ा त्याच दिवशी दुपारी तीन व संध्याकाळी पाच वाजता शिवाजीनगरसाठी सुटतील. व्होल्वोच्या या मार्गासाठी ४७७ रुपये भाडेआकारणी करण्यात येणार आहे.