लष्कराच्या नर्सिग कॉलेजमधील चाळीस विद्यार्थिनींना लेफ्टनंट पदवी Print

प्रतिनिधी
लष्कराच्या आर्म फोर्सेस मिलिटरी कॉलेजच्या (एएफएमसी) नर्सिग कॉलेजमधून पदवी घेतलेल्या चाळीस विद्यार्थिनींच्या पासिंग आऊट परेडचा कार्यक्रम बुधवारी उत्साहात पार पडला. नर्सिगची पदवी पूर्ण केल्याने चाळीस विद्यार्थिनींना एएफएमसीचे संचालक एअर मार्शल जी. एस. जोनेजा यांनी ‘लेफ्टनंट’ पदवी देऊन सन्मानित केले. लष्कराच्या सेवेत दाखल झाल्यामुळे या विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावर एक वेगळेच चैतन्य जाणवत होते. एएफएमसीच्या कॉलेज ऑफ नर्सिगच्या ४३ व्या तुकडीची पासिंग परेड कॉलेजच्या धन्वंतरी सभागृहात पार पडली. यावेळी एएफएमसीचे संचालक एअर मार्शल जी. एस. जोनेजा, कॉलेज ऑफ नर्सिगच्या प्राचार्या एलिझाबेथ जॉन आदी उपस्थित होते. यावेळी या अभ्यासक्रमात  प्रथम क्रमांक पटकाविलेल्या व इतर पुरस्कार प्राप्त विद्यार्थिनींना गौरविण्यात आले. यामध्ये सोनम उत्तम ( प्रथम क्रमांक), रजणी चौधरी (अष्टपैलू कॅडेट्स), अन्सा वी  मोहन (बेस्ट क्लीनिकल) आणि ज्योती शर्मा ( ऑल इंडिया बेस्ट नर्सिग कॅडेट्स) यांचा गौरव करण्यात आला.
प्रथम आलेली सोनम उत्तम हिने सांगितले की, मी मूळची कानपूरची असून सध्या अहमदाबाद येथील मिलिटरी हॉस्पिटल येथे   माझी नेमणूक झाली आहे. कॉलेजमध्ये प्रथम क्रमांक आल्यामुळे खूप आनंदी आहे. वडील लष्करातच मेडिकल सव्‍‌र्हिसेसमध्ये असल्यामुळे या क्षेत्राकडे वळले. या क्षेत्रातच उच्चशिक्षित होण्याची इच्छा सोनमने व्यक्त केली.