‘सीएनजी’ पुरवठय़ाबाबत कंपन्यांच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार Print

आढावा बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा
प्रतिनिधी
शहरात पुढील काळात ‘सीएनजी’चा पुरवठा सुरळीत झाला नाही, तर महाराष्ट्र नॅचरल गॅस व पंपांचे व्यवस्थापन पाहणाऱ्या ऑईल कंपन्यांच्या अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा जिल्हाधिकारी विकास देशमुख यांनी सीएनजी पुरवठय़ाविषयीच्या आढावा बैठकीत दिला. रिक्षा पंचायतीच्या वतीने ही माहिती बुधवारी देण्यात आली.
एकीकडे सीएनजीची सक्ती असताना दुसऱ्या बाजूला त्याचा योग्य पुरवठा होत नसल्याबद्दलचा मुद्दा रिक्षा पंचायतीच्या वतीने वेळोवेळी उपस्थित केला गेला. सीएनजीसाठी रिक्षाचालकांना सात- आठ तास रांगेत थांबावे लागते. याबाबत रिक्षा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन पुरवठा सुरळीत होण्याच्या विविध उपाययोजना निश्चित केल्या होत्या. मात्र, त्यानंतरही पुरवठय़ात सुधारणा न झाल्याने नुकतीच जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी सीआरपीसी १३३ नुसार गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला. पंचायतीचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव, निमंत्रक नितीन पवार, पुरवठा अधिकारी ज्ञानेश्वर जवंजाळ, पालिकेचे जकातप्रमुख विलास कानडे, सहायक पोलीस आयुक्त काशिनाथ उंबरजे महाराष्ट्र नॅचरल गॅसचे सरव्यवस्थापक संजय शर्मा आदी त्या वेळी उपस्थित होते.
बैठकीत झालेले इतर निर्णय पुढीलप्रमाणे- सीएनजीच्या अपुऱ्या कमिशनबाबत पंपधारकांशी त्वरीत चर्चा करावी. सीएनजी पंप सुरू करण्यासाठी कंपनीने कालबद्ध कार्यक्रम राबवावा. नवीन पंपांच्या परवानगीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात एक खिडकी योजना. जकातीसाठी लागणारा वेळ टाळण्यासाठी पालिका अनामत जकात व्यवस्था सुरू करणार.