पीएमपी बसच्या दारात उभे राहिलेल्या तरुणाचा डोक्याला खांब लागल्याने मृत्यू Print

प्रतिनिधी
गर्दी असल्याने पीएमपीएल बसच्या दरवाजात उभे राहून प्रवास करणाऱ्या तरुणाच्या डोक्याला रस्त्याकडेच्या सिग्नलाचा खांब लागल्याने मृत्यू झाला. स्वारगेट येथील व्होल्गा चौकात घडलेल्या या घटनेत आणखी एक जण जखमी झाला आहे.
जोसाराम ग्रासीया (वय २७, रा. राजस्थान) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. तर दीपक देवीदास गावडे (वय १८, रा. कोंढवा बुद्रुक) हा या घटनेत जखमी झाला आहे. या प्रकरणी बाबुराव कृष्ण कुंभार (वय ४०, रा. चिंचोली, ता. हवेली) या बस चालकावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना १२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सव्वासातच्या सुमारास ही घटना घडली. कागदपत्रांची शहानिशा केल्यानंतर मंगळवारी याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला, असे स्वारगेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राम पठारे यांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वारगेटकडून कात्रजला ही पीएमपीएलची बस निघाली होती. सायंकाळची वेळ असल्यामुळे बसमध्ये खूप गर्दी होती. त्यामुळे बसच्या दरवाजात काही प्रवासी उभे होते. त्या वेळी जोसाराम, दीपकसह काही जण बसच्या दरवाजाजवळ पायरीवर उभे राहून प्रवास करत होते. बसमध्ये गर्दी असूनही चालक भरधाव बस चालवत होता. व्होल्गा चौकात आल्यानंतर जोसाराम व इतर दोघांना रस्त्यावरील सिग्नलाचा खांब लागला. डोक्याला मार लागल्याने जोसारामचा मृत्यू झाला. दीपक जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.