पीएमपीचा प्रवास.. नव्हे जीवघेणी सर्कस! Print

प्रतिनिधी
थांब्याबर बस येऊन थांबताच प्रवाशांचा लोंढा बसकडे धावतो.. काही चपळ प्रवासी आधीच भरलेल्या बसमध्ये उभे राहण्यासाठी जागा पटकावतात.. उरलेले प्रवासी अर्धे शरीर बसच्या बाहेर असलेल्या अवस्थेत पायऱ्यांवर अक्षरश: लटकतात.. एखाद्या सूटकेसमध्ये सामान कोंबावे तसे कोंबून भरलेल्या प्रवाशांचा प्रवास सुरू होतो.. पुण्यातील सर्वच मुख्य रस्त्यांवर गर्दीच्या वेळी दिसणारे हे चित्र!
१) फुले मार्केट गाडीखाना, वेळ- सायं. ५:३०
मनपा भवनहून कात्रजकडे जाणारी बस भरून आल्याने प्रवाशांसाठी बसमध्ये जागा नव्हती. बस थांब्याऐवजी रस्त्याच्या मधोमधच थांबली. शालेय विद्यार्थी आणि तरुणांनी धावत जाऊन गर्दीत जागा पटकावली, पण ज्येष्ठ नागरिक आणि महिला मात्र बसमध्ये चढू शकत नव्हत्या. गर्दी असल्यामुळे महिलांनाही दारातच लटकणे भाग पडले. हातात सामानाच्या पिशव्या घेतलेले ज्येष्ठ नागरिक बसच्या दारात कसेबसे उभे होते. यातच मागच्या दाराने उतरणारे महाभाग दारात लटकणाऱ्यांना तुडवत एकदाचे उतरले आणि दारात लोंबकळणारे आधारासाठी टेकू शोधत असतानाच बस सुरू झाली.. काही बसमध्ये तर बसच्या दोन्ही दारांमध्ये हेच चित्र होते.
२) स्वारगेट, वेळ- सायं. ६:००
निगडी, शिवाजी नगर, न. ता. वाडी, म. हौ. बोर्ड, अप्पर डेपो या बस तुडुंब भरलेल्या होत्या. धनकवडीची बस पकडायला प्रवाशांना अक्षरश: सर्कस करावी लागत होती. स्वयंचलित पद्धतीने दारे बंद होऊ शकणाऱ्या बसची पुढची दारे बंद ठेवली गेली तरी गर्दीच्या लोंढय़ामुळे बसची मागची दारे बंद करता येत नव्हती. तिथे शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची सर्वाधिक गर्दी होती. बसच्या दारात उभ्या राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तरांमुळे त्यांच्या पाठोपाठ चढू पाहणाऱ्यांना अडथळा होत होता. सर्व प्रवासी पूर्णपणे चढलेले नसतानाच बस चालू झाली. बसच्या बाहेर अर्धवट लोंबकळणारे बस ठोकून ती थांबविण्याचा प्रयत्न करत होते. शेवटी दारातील प्रवाशांना ढकलून आत कोंबत आणखी प्रवासी दारात लटकले अन् बस सुरू झाली.
३) एसएनडीटी महाविद्यालयाजवळील बस थांबा, वेळ- सायं. ६:३०
इथे थांब्यावर पुरेसा उजेड नव्हता. काही बस थांबवल्याही जात नव्हत्या. त्यामुळे जी बस येईल ती पकडण्यासाठी प्रवासी जिवाचा आटापिटा करत होते. बसमध्ये तुडुंब गर्दी होतीच. पुणे स्टेशनहून एन.डी.ए. गेटकडे जाणाऱ्या बसमध्ये तर श्वासही घ्यायला त्रास व्हावा इतकी गर्दी होती.
४) बालगंधर्व चौक, वेळ- सायं. ७:३०
मनपाहून कोथरूड डेपोला जाणारी जवळपास प्रत्येक बस पूर्ण भरलेली होती. निगडीहून कात्रजला आणि अप्पर डेपोला जाणाऱ्या बसही खचाखच भरून जात होत्या. बसच्या पायऱ्यांवर प्रवासी नसले तरी आतमध्ये गर्दी असल्यामुळे थोडा मोकळा श्वास घेता यावा यासाठी अनेक प्रवासी आपणहून बसच्या दारातच थांबणे पसंत करत होते.     स्वारगेट येथील व्होल्गा चौकात बसच्या दारात लोंबकळून प्रवास करणाऱ्या एका युवकाला सिग्नलच्या खांबाला धडकून जीव गमवावा लागला. चारच दिवसांपूर्वी ही घटना घडली. या पाश्र्वभूमीवर ‘टीम लोकसत्ता’ ने शहरातील प्रमुख रस्त्यांवरील ‘पीएमपीएमएल’ च्या वाहतुकीची ऐन गर्दीच्या वेळी पाहणी केली. त्यापैकी काहींचा ‘आँखो देखा हाल’-