लिफ्टमध्ये अडकलेल्या मराठी कलाकारांची अग्निशामक दलाकडून काही मिनिटांमध्ये सुटका Print

प्रतिनिधी
भारती विद्यापीठ परिसरात एका मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी आलेले प्रसिद्ध मराठी अभिनेते मकरंद अनासपुरे व इतर चार मराठी कलाकार लिफ्टमध्ये अडकल्याची घटना बुधवारी पावणे तीनच्या सुमारास घडली. अग्निशामक दलाच्या जवानांनी काही मिनिटांमध्ये त्यांना सुखरूप बाहेर काढले.
कात्रज अग्निशामक दलाच्या  केंद्राचे वसंत भिलारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारती विद्यापीठ येथे एका मराठी चित्रपटाचे चित्रीकरण सुरू आहे. त्यासाठी अनासपुरेसह काही मराठी कलाकार या ठिकाणी आले होते. भारती विद्यापीठाच्या गेस्ट हाऊसच्या इमारतीमधून लिफ्टने खाली तळमजल्यावर आल्यानंतर लिफ्टचा दरवाजा उघडला नाही. त्यावेळी लिफ्टमध्ये अनासपुरे, विजू केंकरे, आनंद इंगळे, सुनील गोडबोले आणि सुहास परांजपे हे होते. दरवाजा न उघडल्यामुळे कलाकारांपैकी एकाने अग्निशामक दलास फोन करून घटनेची माहिती दिली. कात्रज अग्निशामक दलाची एक गाडी तत्काळ घटनास्थळी पोहोचली. त्यांना काही मिनिटात अग्निशामक दलाच्या जवानांनी सुखरूप बाहेर काढले. लिफ्टचा सेन्सर बंद झाल्यामुळे दरवाजा बंद झाला असल्याची शक्यता आहे. या कारवाईत फायरमन वसंत भिलारे, भरत वाडकर, जितेंद्र कुंभार, रोहिदास भांगरे, रमेश भिलारे यांनी काम केले.