परीक्षा विभागाच्या कर्मचाऱ्यांचाच ‘रॅकेट’मध्ये हात Print

पुनर्मूल्यांकनातही हस्तक्षेप केल्याचे ठोस पुरावे
डमी विद्यार्थी पुरविण्याचे प्रकरण
प्रतिनिधी
परीक्षेला डमी विद्यार्थी पुरविण्याचे ‘रॅकेट’ चालविणाऱ्यांनी पुणे विद्यापीठाच्या पुनर्मूल्यांकनातही फेरफार केल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले असून, या प्रकरणी परीक्षा विभागातील किमान तीन कर्मचाऱ्यांविरुद्ध ठोस पुरावेसुद्धा हाती आले आहेत. या प्रकरणाचा सूत्रधार व पूना कॉलेजमधील कारकून सलीम शेख हाही पूर्वी विद्यापीठाच्या परीक्षा विभागातच नोकरीला असल्याचे तपासात पुढे आले आहे. दरम्यान, हे सारे बाहेर येऊनही विद्यापीठातील विविध कर्मचारी संघटनांनी पोलीस तपासाबाबात आक्षेप घेऊन विद्यापीठात निषेध सभाही घेतली.
विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करून देण्यासाठी डमी विद्यार्थी पुरविणाऱ्यांचे ‘रॅकेट’ पोलिसांनी गेल्या आठवडय़ात उघड केले. सुरुवातीला वरवरचे वाटणारे हे प्रकरण खूपच खोलवर असल्याचे तपासाद्वारे उघड होऊ लागले आहे. या प्रकरणात आतापर्यंत तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यात विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील कर्मचारी थेट सामील असल्याचे आता पोलीस तपासात उघड झाले आहे. लष्कर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक सुषमा चव्हाण यांनी याबाबत सांगितले, की या प्रकरणात परीक्षा विभागातील किमान तीन कर्मचारी सामील असल्याचे तपासात उघड झाले आहे. इतकेच नाही तर या प्रकरणात अटक करण्यात आलेला सलीम शेख हा पूना कॉलेजचा कारकून पूर्वी विद्यापीठाच्या परीक्षा विभागात कामाला असल्याचे समजले आहे. तोच या प्रकरणाचा सूत्रधार असल्याचे आतापर्यंतच्या तपासावरून स्पष्ट झाले आहे. या कर्मचाऱ्यांच्या मदतीने विद्यापीठातील पुनर्मूल्यांकनातही फेरफार करण्यात आले आहे. त्याबाबतचे ठोस पुरावेही पोलिसांना मिळाले आहेत. याबाबतची कागदपत्रे व नोंदी तपासासाठी मागितल्या आहेत, असेही चव्हाण यांनी सांगितले.
विद्यापीठ कर्मचारी संघटनांची ओरड
दरम्यान, या प्रकरणी पोलीस पुणे विद्यापीठात तपास करत असल्याने त्यांच्या चौकशीचा कर्मचाऱ्यांना विनाकारण त्रास होत असल्याची ओरड आता विद्यापीठातील कर्मचाऱ्यांनी सुरू केली आहे. पोलिसांनी कुलगुरूंकडे पुरावे द्यावेत आणि कुलगुरूंनी विद्यापीठ पातळीवर त्यांची शहानिशाकरून मग कारवाईचा विचार करावा, अशी अजब मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे. परीक्षा विभागातील कर्मचाऱ्यांची पोलिस चौकशी करत असल्याच्या निषेधार्थ विद्यापीठातील विविध कर्मचारी संघटनांनी बुधवारी निषेध बैठक घेतली.
या निषेध बैठकीमध्ये पुणे विद्यापीठ कृती समिती आणि महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचारी संघटनेचे शंभरहून अधिक कार्यकर्ते सहभागी झाले होते. या संघटनेच्या लोकांनी कुलगुरूंची भेट घेऊन त्यांच्यासमोरही आपले गाऱ्हाणे मांडले. कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी मात्र, पोलीस तपासाला पूर्ण सहकार्य केले जाईल व निर्दोष कर्मचाऱ्यांना त्रास होणार नाही, अशी भूमिका घेतली आहे.