संक्षिप्त Print

‘ज्योतीची निजज्योती’ पुस्तकाचे प्रकाशन
विश्वशांती केंद्र (आळंदी) आणि माईर्स एमआयटीच्या वतीने प्रयागअक्का कराड यांच्या जीवनावरील ‘ज्योतीची निजज्योती’ या ओवीबद्ध चरित्रग्रंथाचे मंगळवारी प्रकाशन करण्यात आले. डॉ. रतनलाल सोनिग्रा यांनी हे पुस्तक लिहिले आहे. या वेळी पुणे सांस्कृतिक महिला संघाच्या वतीने प्रयागअक्का यांना ‘समर्पित जीवन गौरव’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, संस्थेचे संस्थापक संचालक डॉ. विश्वनाथ कराड, संस्थेचे विश्वस्त डॉ. चंद्रकांत पांडव, प्रा. सुधीर राणे, विश्वशांती संघाचे कार्यकारी संचालक डॉ. संजय उपाध्ये, गुरूनाथ विश्वनाथ मुंगळे गुरूजी, श्रीकृष्ण कर्वे गुरूजी, पंढरपूरच्या श्री विठ्ठल रूक्मिणी देवस्थानचे अध्यक्ष अण्णासाहेब डांगे, पुणे महिला सांस्कृतिक संघाच्या अध्यक्ष उषा जोगळेकर आदी या वेळी उपस्थित होते.
पुणे नवरात्र महोत्सवाचे उद्घाटन
पुणे नवरात्र महिला महोत्सवाचे उद्घाटन पुण्याच्या महापौर वैशाली बनकर यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. सध्या गाजत असलेल्या ‘पुढचं पाऊल’ या मालिकेतील अभिनेत्री हर्षदा खानविलकर यांची उपस्थिती हे या कार्यक्रमाचे वैशिष्टय़ ठरले. त्यांनी उपस्थित महिलांशी संवाद साधत त्यांची मने जिंकली. पुणे नवरात्र महोत्सवाचे अध्यक्ष आबा बागुल, महिला महोत्सवाच्या अध्यक्षा जयश्री बागुल, महोत्सवाच्या उपाध्यक्षा निर्मला जगताप, शिक्षण मंडळाच्या सदस्या वासंती काकडे आदींनी या कार्यक्रमास उपस्थिती लावली.  
‘दि लाऊंज जर्नल्स’मध्ये गिरीश कुलकर्णी
‘कॅफे कॉफी डे’ च्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता गिरीश कुलकर्णी याच्यासोबत ‘दि लाऊंज जर्नल्स’ चे आयोजन करण्यात आले होते. युवकांची विविध क्षेत्रांतील सुप्रसिद्ध व्यक्तींशी भेट घडवून आणावी, हा या कार्यक्रमामागचा मुख्य हेतू आहे. गिरीश कुलकर्णीने शहरातील युवकांसह अभिनय व कल्पक लेखनावर आधारित संवादपर सत्रही घेतले. तसेच, या क्षेत्रातील अनुभव आणि विविध विषयांवर उपस्थितांशी संवाद साधला. या प्रसंगी, कॅफे कॉफीडे चे मार्केटिंग विभागाचे अध्यक्ष के. रामाकृष्णन उपस्थित होते.
आर्थिक मदतीचे आवाहन
सुरेखा यादव (वय ३५) या श्वसनाच्या आजाराने त्रस्त आहेत. त्यांच्यावर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या उपचारांसाठी दोन लाख रुपये खर्च येणार असून हा खर्च करण्यास त्यांचे कुटुंबीय पूर्णत: असमर्थ आहेत. तरी त्यांना मदत करण्यास इच्छुक असणाऱ्यांनी ०२०-६६०२३०००, ४०१५१००० या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.