सदनिका खरेदी करताना बांधकाम नकाशे तपासा Print

महापालिकेचे ग्राहकांना आवाहन
 प्रतिनिधी
शहरात सदनिका खरेदी करताना ग्राहकांनी फक्त मंजूर ले-आऊट न पाहता संबंधित बांधकामाचे महापालिकेने मंजूर केलेले नकाशेही आवर्जून पाहावेत तसेच मंजूर नकाशांची पूर्ण खात्री करून घ्यावी, असे आवाहन महापालिकेच्या बांधकाम नियंत्रण विभागाने केले आहे.
शहरात सुरू असलेल्या बेकायदा बांधकामांवर महापालिकेने कारवाई सुरू केली असून या कारवाईत आता बिल्डरांनी केलेल्या बेकायदा बांधकामांवरील कारवाई हाती घेण्यात आली आहे. अनेक बिल्डरांनी टीडीआर मिळेल या भरवशावर वा तसे सांगून बहुमजली इमारती उभ्या केल्या आहेत. या इमारतींमधील काही मजल्यांना महापालिकेची बांधकाम परवानगी असते. मात्र, टीडीआरच्या भरवशावर बांधलेल्या शेवटच्या चार, पाच मजल्यांना परवानगी नसते, ही वस्तुस्थिती आहे. अशा प्रकरणांमध्ये टीडीआर घेतलाच जात नाही, अशाही तक्रारी आहेत.
या पाश्र्वभूमीवर महापालिकेने मंजूर बांधकाम नकाशांची तपासणी करूनच सदनिका खरेदी करण्याचे आवाहन ग्राहकांना केले आहे. अनेकदा बिल्डर वा संबंधित विकसकाकडून मान्य ले-आऊट ग्राहकाला दाखवला जातो. मात्र, ले-आऊट मान्य असला, तरी बांधकामाला परवानगी आहे असे गृहित धरणे योग्य ठरणार नाही.
त्यामुळे ग्राहकांनी महापालिकेने मंजूर केलेले बांधकामाचे नकाशे पाहणे, त्यांची शहानिशा करणे व नकाशे मंजूर असल्याची खात्री करणे आवश्यक आहे, असे कळविण्यात आले आहे.