राष्ट्रवादीच्या पुणे अधिवेशनात आगामी निवडणुकांची चर्चा होणार Print

प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यस्तरीय अधिवेशन पुण्याजवळील बालेवाडी येथे २० व २१ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आले असून राज्यभरातून सहा हजार प्रतिनिधी या अधिवेशनाला उपस्थित राहणार असल्याची माहिती बुधवारी येथे पत्रकार परिषदेत देण्यात आली. आगामी निवडणुका तसेच राज्यातील सद्य राजकीय स्थितीसह आर्थिक, सामाजिक विषयांवरील चर्चा व ठराव या अधिवेशनात होणार आहेत.
बालेवाडी येथील छत्रपती क्रीडा नगरीमधील यशवंतराव चव्हाण नगरात हे अधिवेशन होत असून पक्षाध्यक्ष शरद पवार यांची अधिवेशनात पूर्ण वेळ उपस्थिती राहणार असल्याची माहिती पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी दिली. अधिवेशनाचे उद्घाटन प्रांताध्यक्ष मधुकरराव पिचड यांच्या हस्ते शनिवारी (२० ऑक्टोबर) सकाळी दहा वाजता होईल. केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल, विधिमंडळ पक्षाचे नेते अजित पवार, राज्य मंत्रिमंडळातील सर्व मंत्री, तसेच पक्षाचे खासदार, आमदार, जिल्हा परिषदांचे अध्यक्ष, महामंडळांचे अध्यक्ष, साखर कारखान्यांचे व जिल्हा बँकांचे अध्यक्ष आणि संचालक, पंचायत समित्या, जिल्हा परिषदा, नगरपालिका व महानगरपालिकांचे सदस्य या अधिवेशनाला उपस्थित राहणार असल्याचे काकडे यांनी सांगितले.
सन २०१४ मध्ये होणाऱ्या लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने महत्त्वाची चर्चा अधिवेशनात होणार आहे. राज्यातील सद्य राजकीय परिस्थिती तसेच राज्यातील आर्थिक, सामाजिक विषयांवरील चर्चा अधिवेशनात होणार आहे, असेही काकडे यांनी सांगितले.