नोकरीच्या आमिषाने सोळा लाखांची फसवणूक; दोघांना अटक Print

पुणे / प्रतिनिधी
सातारा येथील आरोग्य विभागात नोकरी लावण्याच्या आमिषाने अनेक तरुणांकडून पैसे घेऊन लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी कोथरूड पोलिसांनी दोन तरुणास अटक केली असून त्यांनी आतापर्यंत सहाजणांस १६ लाखांना फसविल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
आदित्य संजय माळवदे (वय २४) आणि रितेश संजय माळवदे (रा. दोघेही- महाराष्ट्र सोसायटी, कोथरूड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत, तर संजय माळवदे याचा शोध सुरू आहे. या प्रकरणी दत्तात्रय शिवाजी कुलकर्णी (वय ३४, रा. खटाव, जि. सातारा) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. कोथरूड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माळवदे यांनी कुलकर्णी यांच्या ओळखीच्या काही तरुणांना सातारा येथील आरोग्य विभागात नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखविले. त्यांच्याकडून सोळा लाख रुपये घेतले. मात्र, त्यानंतर नोकरी न लावता पैसेही परत केले नाहीत. त्याबाबत आरोपींकडे विचारणा केली असता त्यांना आरोपींनी मारहाण केली. पिस्तुलचा धाक दाखवून त्यांच्या कोऱ्या कागदावर सह्य़ा घेतल्या. आतापर्यंत सहा तरुणांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले. यामध्ये आणखी काहीजणांची फसवणूक झाली असल्याची शक्यता असून त्या दृष्टीने तपास सुरू आहे. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक साळुंखे हे अधिक तपास करत आहेत.