संशोधन प्रचलित करण्याकडेही लक्ष द्या - हर्ष मरिवाला Print

पुणे / प्रतिनिधी
‘फक्त नवी निर्मिती करणे, संशोधन करणे पुरेसे नसून आपले संशोधन प्रचलित करण्याकडेही उद्योजकांनी लक्ष देणे गरजेचे आहे,’ असा मंत्र मेरिको लिमिटेडचे चेअरमन व मॅनेजिंग डायरेक्टर हर्ष मरिवाला यांनी मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अ‍ॅग्रीकल्चरच्या ‘औद्योगिक मान पुरस्कार’ सोहळ्यात शुक्रवारी दिला.
मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अ‍ॅग्रीकल्चर तर्फे दरवर्षी उद्योग क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या उद्योजकांना ‘औद्योगिक मान पुरस्कार’ देण्यात येतात. यावर्षी मरिवाला यांच्या हस्ते हे पुरस्कार देण्यात आले. यावेळी मरिवाला यांनी आपल्या आणि आपल्या उद्योग समूहाच्या वाटचालीची गोष्ट शेअर केली. यावेळी मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अ‍ॅग्रीकल्चरचे पदाधिकारी उपस्थित होते. यावर्षी कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीसाठी देण्यात येणारा बी. जी. देशमुख पुरस्कार यावर्षी प्रथमच तीन विभागांमध्ये देण्यात आला. त्यामध्ये ‘कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी- एक्सलन्स पुरस्कार’ टाटा मोटार्सला, ‘इनोव्हेशन पुरस्कार’ प्राज इन्डस्ट्रीला तर ‘एसएमई एक्सेम्प्लरी’ पुरस्कार एक्स्पोनेन्शिअल इंजिनिअर्सला देण्यात आला. ‘डॉ. आर. जी राठी - ग्रीन इनिशिएटिव्ह इन इन्डस्ट्री पुरस्कार’ रिलायन्स इन्डस्ट्रीजच्या नागोठणे येथील उत्पादन विभागाला देण्यात आला, तर याच विभागामध्ये महाराष्ट्र एन्व्हीरो पॉवर लिमिटेडला अ‍ॅप्रिसिएशन सर्टिफिकेट देण्यात आले. ‘जी. एस. पारखे इन्डस्ट्रीयल अ‍ॅवॉर्ड’ अ‍ॅक्वा कॉन्सेप्ट या कंपनीला देण्यात आले. नावीन्यपूर्ण निर्मितीसाठी देण्यात येणारा ‘हरी मालिनी जोशी पुरस्कार’ बाश्को इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला, तर ‘हरी मालिनी जोशी स्पेशल ज्युरी सर्टिफिकेट’ आउट ऑफ द बॉक्स इनोव्हेशन्स या कंपनीला देण्यात आले. महिला उद्योजकांना देण्यात येणारा ‘रमाबाई अनंत जोशी पुरस्कार’ मेलक्स कंट्रोल गिअर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या मानसी बिडकर यांना आणि फ्लुएंट सव्‍‌र्हिस प्रायव्हेट लिमिटेडच्या मुग्धा चांदकर आणि अनुपमा टिळक यांना देण्यात आला.