महावितरणचा कनिष्ठ अभियंता लाच घेताना अटकेत Print

पुणे / प्रतिनिधी, रविवार, २१ ऑक्टोबर २०१२
नवीन वीज मीटर मंजूर करण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच घेताना महावितरण कंपनीच्या कनिष्ठ अभियंत्याला शनिवारी सकाळी हडपसर येथील हांडेवाडी कार्यालयात लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले.
सचिन सुभाष काळे (वय ३८, रा. गंगा व्हिलेज शाखा कार्यालय, हांडेवाडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी इलेक्ट्रिशियन ठेकेदार संजय साहेबराव इरले (वय २८, रा. बी.टी.कवडे रस्ता, मुंढवा) यांनी तक्रार दिली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर येथील महंमदवाडी परिसरातील सात व्यक्तींनी नवीन वीज मीटरसाठी हांडेवाडी येथील महावितरणच्या कार्यालयात अर्ज केला होता. त्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे, शुल्क ही महावितरणच्या कार्यालयात जमा केले होते. हे अर्ज काळे यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी इलेक्ट्रिशियनचे ठेकेदार इरले यांना प्रत्येक मीटर प्रमाणे एक हजार असे सात हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. त्यानुसार इरले यांनी पाच हजार रुपये काळे यांना दिले. उरलेले दोन हजार आणून दिल्यानंतरच वीजजोडणी मंजूर करतो, असे काळे यांनी सांगितले. इरले यांना पैसे देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार विभागाचे पोलीस अधीक्षक सारंग आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक बी. एम. काळे, राजेंद्र गलांडे, पोलीस निरीक्षक विनोद सातव, वैशाली गलांडे यांच्या पथकाने शनिवारी सकाळी सव्वाअकराच्या सुमारास दोन हजार रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली. या प्रकरणी अधिक तपास विनोद सातव हे करत आहेत.