संक्षिप्त Print

‘लायन्स-विलक्स जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर
स्व.दादासाहेब कुदळे जन्मशताब्दी समितीच्या वतीने लायन डॉ.दीपक कुदळे यांच्या हीरक  महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त ‘लायन्स-विलक्स जीवनगौरव पुरस्कार’ आणि ‘लायन्स-विलक्स सुवर्ण गौरव पुरस्कार’ देऊन विविध क्षेत्रातील ११ व्यक्तींना सन्मानित करण्यात येणार आहे. या वेळचा जीवनगौरव पुरस्कार नरेंद्र दाभोलकर, डॉ. खोदू इरानी, जयंतराव ससाणे, किरण ठाकूर, दादासाहेब बोरावके व सदानंद मोहोळ यांना जाहीर झाला आहे. तसेच, डॉ.मधुसूदन झंवर, कर्नल संभाजी पाटील, डॉ.सतीश देसाई, प्रशांत कुलकर्णी आणि मृणाल कुलकर्णी यांना सुवर्ण गौरव पुरस्कार देण्यात येणार आहे. विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते २९ ऑक्टोबर रोजी बालगंधर्व रंगमंदिर येथे या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.
‘अक्षरधारा’ च्या वतीने ‘मायमराठी शब्दोत्सव’
‘अक्षरधारा’ च्या वतीने २४ ऑक्टोबरपासून ९ डिसेंबर या कालावधीत ‘मायमराठी शब्दोत्सव’ साजरा करण्यात येणार आहे. २४ ऑक्टोबरला अक्षरधाराला १८ वर्षे पूर्ण होत आहेत. या शब्दोत्सवाचे उद्घाटन ज्येष्ठ अभिनेते डॉ.श्रीराम लागू यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या शब्दोत्सवात इंग्रजी व मराठी भाषेतील नामवंत साहित्यिकांची एक लाखाहून अधिक पुस्तके उपलब्ध असून पुस्तकांवर १० पासून ५० टक्क्य़ांपर्यंत सूट देण्यात येणार आहे. दिवाळी अंकांचे प्रकाशन, विचारवंत संदीप वासलेकर, डॉ.अच्युत गोडबोले आदी मान्यवरांच्या मुलाखती, कलाकारांशी गप्पा अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन या शब्दोत्सवांतर्गत करण्यात आले आहे.
रिपब्लिकन पार्टीच्या वतीने आंदोलन
मुंबईतील दादर येथील इंदू मिलच्या जागेवर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय स्मारक बांधावे, या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टीच्या वतीने जेलभरो आंदोलन करण्यात आले. या वेळी बेलबाग चौकात निदर्शने करणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली.  ६ डिसेंबपर्यंत ही जागा स्मारकासाठी देण्यात आली नाही तर आंबेडकर अनुयायी या जागेचा ताबा घेतील, असा इशारा या वेळी देण्यात आला. आरपीआयचे पुणे शहर अध्यक्ष महेंद्र कांबळे, नवनाथ कांबळे, बाळासाहेब जानराव, परशुराम वाडेकर आदी या वेळी उपस्थित होते.
उपचारासाठी मदतीचे आवाहन
सुरेश तोंडे (वय ४४) हे श्वसनाच्या आजाराने त्रस्त आहेत. त्यांना अतिदक्षता विभागात कृत्रिम श्वासोच्छ्वासावर ठेवण्यात आले असून यासाठी अंदाजे एक लाख ऐंशी हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. हा खर्च करण्यास त्यांचे कुटुंबीय पूर्णत: असमर्थ आहे. तरी त्यांना मदत करण्यास इच्छुक असणाऱ्यांनी ०२०-६६०२३०००, ४०१५१००० या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.
रांगोळी स्पर्धेचे आयोजन
पुणे नवरात्र महिला महोत्सवाअंतर्गत रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्त्री-भ्रूणहत्या या विषयावर आधारित रांगोळया हे या स्पर्धेचे वैशिष्टय़ ठरले. स्त्री-भ्रूणहत्या-विचार करायलाच हवा, तुम्हीच ठरवा देवदूत व्हायचे का यमदूत, असे आवाहनपर संदेश रांगोळीच्या माध्यमातून देण्यात आले. शीला जाजू व रोमा भोर यांनी या स्पर्धेचे परीक्षण केले. संतोषी कांबळे यांनी स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला तर लता भोसले आणि वर्षां कोंढरे यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. सुमारे शंभर महिला या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या.
‘द लॉर्ड स्पिक्स’ माहितीपटाचे प्रकाशन
‘पंचम क्रिएशन’ च्या वतीने सुप्रसिद्ध वादक व संगीत संयोजक केरसी लॉर्ड यांच्यावर आधारित ‘द लॉर्ड स्पिक्स’ या माहितीपटाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. तसेच, लॉर्ड यांच्या कारकिर्दीचा मागोवा घेणारा विशेष कार्यक्रमही या वेळी सादर करण्यात येणार आहे. जितेंद्र भुरुक, नरेंद्र डोळे, प्रशांत नासेरी, मेधा चांदवडकर आदी गायक या कार्यक्रमात गाणी सादर करणार असून या कार्यक्रमाचे संगीत नियोजन विवेक परांजपे यांचे आहे. हा कार्यक्रम २५ ऑक्टोबर रोजी कोथरुड येथील यशवंतराव चव्हाण नाटय़गृह येथे होणार आहे.
योगी एम यांच्या पुस्तकाचा मराठी अनुवाद प्रकाशित
योगी एम यांच्या मूळ इंग्रजीत लिहिलेल्या पुस्तकाच्या ‘हिमालयवासी गुरुच्या योगी शिष्याचे आत्मकथन’ या मराठी अनुवादाचे प्रकाशन नुकतेच करण्यात आले. या वेळी प्रसिद्ध संगणकतज्ज्ञ डॉ.विजय भटकर, योगी एम, माईर्स एमआयटीचे प्रमुख डॉ.विश्वनाथ कराड, अनुवादकर्ते  श्रीरंग पटवर्धन आदी उपस्थित होते.