सराफांना गंडा घालणाऱ्यास अहमदाबाद येथे अटक Print

प्रतिनिधी
सांगवी येथील सराफांना गंडा घालून सोने चोरून नेणाऱ्या एका चोरटय़ास मोबाईलच्या लोकेशनवरून माग काढत अहमदाबाद येथे सांगवी पोलिसांनी पकडले. त्याच्या ताब्यातून आठ लाख ३१ हजार रूपयांचे सोने-चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. सोनराज पुखराज लकारा (रा. श्रीजी अपार्टमेन्ट, चांदखेडा, गुजरात) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. सांगवी येथील एका सराफास गंडविल्याप्रकरणी दलपतसिंह उद्यसिंग राजपुत (वय २९), पुखराज लकारा आणि सोनराज हे फरार होते. याचा तपास सांगवी पोलीस करत होते. सांगवी पोलीस ठाण्यातील कर्मचारी गणेश काळे यांनी मोबाईलचे लोकेशन पाहिले असता हे आरोपी अहमदाबाद येथील चांदखेडा येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार या ठिकाणी जाऊन शोध घेतला असता सोनराज सापडला. त्याच्याकडून आठ लाख ३१ हजार रुपयांचे सोने-चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.