मोबाईल व लॅपटॉप चोरीच्या गुन्ह्य़ात तिघांना अटक Print

पुणे / प्रतिनिधी
गुडलक चौकात लॅपटॉप व मोबाईल चोरीच्या गुन्ह्य़ात दिल्ली येथील तिघांना शनिवारी सायंकाळी डेक्कन पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून या प्रकारचे तीन गुन्हे उघडकीस आले आहेत. अबजल अन्वर पठाण (वय ४२), नदीम मेहबुब कुरेशी (वय २९, रा. दिल्ली) आणि सलीम नईम कुरेशी (वय २०, रा. उत्तरप्रदेश) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी गुडलक चौकात लॅपटॉप चोरी करणारे आरोपी आले असल्याची माहिती मिळाली होती, त्यावरून या तिघांना डेक्कन पोलीस ठाण्याचे निरीक्षक मनोहर जोशी यांच्या मार्गदर्शनाखाळी फौजदार दायमा, कर्मचारी बिभीषण कानेरक, सुधाकर सपकाळ, पांडुरंग जगताप, जाधव यांनी गुडलक चौकात पकडले. हे तिघेही १८ ऑक्टोबर रोजी फिरण्यासाठी पुण्यात आले होते. पुणे स्टेशन येथील एका लॉजवर राहून संध्याकाळी मोबाईल, लॅपटॉप चोरी करत असत. त्यांच्याकडून आतापर्यंत याप्रकारचे तीन गुन्हे उघडकीस आले आहेत. न्यायालयाने त्यांना तपासासाठी एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.