चिंचवडमध्ये भरणार ‘महाराष्ट्राची जत्रा’ Print

१५० बचत गटांचा सहभाग
पिंपरी / प्रतिनिधी
पवनाथडी जत्रेच्या धर्तीवर यशस्विनी सामाजिक अभियान व सुनेत्रा अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने ७ ते १२ नोव्हेंबपर्यंत चिंचवडला ‘महाराष्ट्राची जत्रा’ हे राज्यस्तरीय बचत गट व गृहोपयोगी वस्तूंचे प्रदर्शन भरणार आहे. प्रथम येईल त्यास प्राधान्य या तत्त्वाने १५० बचत गटांचा नि:शुल्क सहभाग करण्यात येणार असून नागरिकांना मोफत प्रवेश राहणार आहे.
महापौर मोहिनी लांडे व आमदार लक्ष्मण जगताप यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या वेळी पक्षनेत्या मंगला कदम व संयोजिका अपर्णा डोके उपस्थित होते.
मोरया क्रीडांगणावर सकाळी ११ ते रात्री दहापर्यंत ही जत्रा चालणार असून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे यांना उद्घाटनासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.
या जत्रेत सहभागी होण्यासाठी महिला बचत गटांना मोफत स्टॉल उपलब्ध करून दिले जाणार आहेत. एका वस्तूचा अथवा पदार्थाचा एकच स्टॉल राहणार आहे. प्रथम येईल त्यास प्राधान्य या न्यायाने स्टॉलचे वाटप होणार असून २५ ऑक्टोबपर्यंत नावनोंदणी होणार आहे.
त्यासाठी डोके यांचे संपर्क कार्यालय, विठ्ठल मंदिराजवळ, तानाजीनगर येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रदर्शनात सर्वाना प्रवेश मिळणार आहे.