रुद्राक्षाची माळ देऊन मानसिक आजार बरा करण्याच्या बहाण्याने तरूणीची फसवणूक Print

महिलेसह दोघांना अटक
प्रतिनिधी
मंत्राने सिद्ध केलेली रुद्राक्षाची माळ देऊन मानसिक आजार बरा करण्याचा दावा करून एका तरूणीकडून पैसे घेऊन तिची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी खडक पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना अधिक तपासासाठी दोन दिवस पोलीस कोठडी सुनावली.
सुमंत मृगांक मुखर्जी (वय ५३) सीमा सुमंत मुखर्जी (वय ४८ रा. दोघेही- जयनिवास, गुरू नानकनगर) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. त्यांच्यावर औषधी द्रव्य तिलस्मी उपचार अधिनियम १९५४ अनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी धनश्री प्रतापकुमार पाटील (वय २८, रा. गिरिजाशंकर सोसायटी) यांनी फिर्याद दिली आहे. खडक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाटील यांना मार्च २०१२ पासून भीतीदायक स्वप्नं पडत होती. त्यामुळे मनावर खूप ताण आल्याने त्यांची एकाग्रता भंग झाली होती. त्यामुळे त्यांना आपल्यावर कोणीतरी जादुटोणा केला आहे असे वाटल्यामुळे, यातून मार्ग शोधण्यासाठी वृत्तपत्रात आलेल्या जाहिरातीतून त्यांनी मुखर्जी यांच्याशी संपर्क साधला. मुखर्जी यांनी पाटील यांना शंकरशेठ रस्त्यावरील त्यांच्या घरी बोलविले. त्यांना त्यांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी रुद्राक्षाची माळ बनवून ती तांत्रिक मंत्राने सिद्ध करून मे महिन्यापर्यंत देतो. हे रुद्राक्ष अभिमंत्रित केल्याने तत्काळ संरक्षण मिळून तुमच्या मनोकामना पूर्ण होतील, असे आमिष दाखविले. रुद्राक्षासाठी त्यांच्याकडून ५३ हजार रूपये घेतले. मात्र ऑक्टोबर आला तरी त्यांना कोणतीच रुद्राक्षाची माळ दिली नाही. त्यामुळे त्यांच्याकडे पाटील पैसे मागण्यासाठी गेल्या असता त्यांना सुमंत, सीमा मुखर्जी व आणखी एका अल्पवयीन मुलीने धक्काबुक्की केली.
या दोघांना अटक करून दुपारी सुट्टीच्या न्यायालयात हजर केले.  फसवणूक करुन घेतलेली रक्कम (५३ हजार रु.) जप्त करायची आहे. आणखी किती लोकांची फसवणूक केली आहे याचा तपास करायचा असल्यामुळे सहायक सरकारी वकील ए. के. पाचरणे यांनी त्यांना पोलीस कोठडीची मागणी केली. ती मान्य करत न्यायालयाने दोन दिवस पोलीस कोठडी सुनावली.