स.प. महाविद्यालयाजवळ पकडलेले तिघे जण खून करण्यासाठीच दबा धरून बसल्याचे उघड Print

पोलीस हवादलार व पोलीस पथकाचा आयुक्तांकडून सत्कार
प्रतिनिधी
विश्रामबाग पोलीस ठाण्यातील एका पोलीस हवालदाराच्या चाणाक्षपणामुळे स. प. महाविद्यालय चौकात रविवारी सकाळी एका हल्ल्याचा कट उधळून तिघांना नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी पाठलाग करून पकडले होते. पकडण्यात आलेले आरोपी हे पूर्वीच्या भांडणाचा वचपा काढण्यासाठी एका रिक्षा चालाकाचा खून करण्यासाठी या ठिकाणी दबा धरून बसल्याचे तपासात उघड झाले आहे. दक्ष राहून आरोपींना पकडल्यामुळे पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी कारवाईत सहभागी असलेल्यांचा बक्षीस देऊन सन्मान केला.
कुणाल राजेंद्र परदेशी (वय २४, रा. घोरपडी पेठ), नितेश विनायक साबळे (वय २१, रा. बालाजीनगर, धनकवडी) आणि सोहेल फारूख शेख (वय १८, रा. राष्ट्रभूषण चौक, खडकमाळ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर त्यांचे दोन साथीदार नीलेश ओव्हाळ (रा. दांडेकर पूल) आणि विपुल इंगवले (रा. खडकमाळ आळी) अशी फरार आरोपींची नावे आहेत, अशी माहिती पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पोळ यांनी सांगितले की, विश्रामबाग पोलीस ठाण्याचे कर्मचारी सुनील ढमाले यांनी स.प.महाविद्यालय चौकात एका व्यक्तीकडे एक पिस्तूलही त्यांना दिसले. ते तिकडे जात असता सर्व आरोपी पळाले. ढमाले यांनी त्यांना पाठलाग करू पकडले. त्यांना पोलीस शिपाई सारिका सानप यांनी मदत केली. दत्तवाडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयसिंह गायकवाड हे तेथून जात होते. गायकवाड यांनीही त्यांचा पाठलाग केला. नागरिक विशाल पवार व रवींद्र आयनापुरे व पोलिसांनी तिघांना पकडले. त्यांच्याकडून पोलिसांनी एक पिस्तूल, धारदार शस्त्रं जप्त केली आहेत. ते चंद्रकांत यादव या रिक्षा चालकाचा खून करण्यासाठी ते या ठिकाणी जमल्याचे तपासात समजले. अटक केलेला परदेशी याच्यावर पूर्वीच बेकायदा शस्त्र बाळगल्याचा गुन्हा दाखल आहे. ही कामगिरी करणारे पोलीस पथक व दोन नागरिकांचा सत्कार करण्यात आला आहे.