साखर कारखान्यांना प्राप्तिकरातून सवलतीसाठी पंतप्रधानांची भेट घेणार - हर्षवर्धन पाटील Print

पुणे/ प्रतिनिधी
अडचणीत असलेल्या साखर कारखान्यांना २७०० कोटी रुपयांच्या प्राप्तिकरातून सवलत मिळावी या मागणीसाठी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमवेत शिष्टमंडळ पंतप्रधानांची भेट घेणार असल्याचे सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
हर्षवर्धन पाटील म्हणाले, राज्यातील साखर कारखान्यांना २२०० कोटी रुपयांचा प्राप्तिकर आकारण्यात आला आहे. त्यामध्ये यंदाच्या वर्षी आणखी पाचशे कोटी रुपयांची भर पडली आहे. आधीच अडचणीत असलेल्या साखर उद्योगाला हा भरुदड सहन करणे अवघड आहे. त्यामुळे या प्राप्तिकरातून सूट मिळावी यासाठी पंतप्रधानांची भेट घेऊन मागणी करण्यात येणार आहे. या संकटातून बाहेर पडण्यासाठी कायद्यात बदल करावा, अशी विनंतीदेखील पंतप्रधानांना करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे प्राप्तिकराच्या मुद्दय़ावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याच्या दृष्टीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी करण्यात येईल.
दुष्काळामुळे राज्यातील उसाचे बियाणे संपुष्टात आले आहे. आगामी दोन वर्षांत उसाची लागवड करायची असेल तर, बियाणे उपलब्ध नाही अशी परिस्थिती आहे.
हा पेच सोडविण्यासाठी साखर आयुक्त, साखर सचिव, कृषी आयुक्त आणि वसंतदादा शुगर इन्स्टिटय़ूट (व्हीएसआय) यांच्या संयुक्त विद्यमाने ५० हजार हेक्टर क्षेत्रावर बियाणे तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.
इचलकरंजी येथील जवाहर साखर कारखाना येथे पुढील वर्षी ५ जानेवारी रोजी साखर परिषद घेण्यात येणार आहे. या परिषदेची रूपरेषा ठरविण्यासाठी मंगळवारी (२३ ऑक्टोबर) बैठक होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.