देशासाठी काम करू शकलो हे मोठे भाग्य- डॉ. भटकर Print

पुणे / प्रतिनिधी
‘संगणक, दूरसंचार व इलेक्ट्रॉनिक क्षेत्राचा भारतामध्ये विकास करण्यासाठी जे काम करू शकलो त्यासाठी मी स्वत:ला भाग्यवान समजतो. या कामाने देशाची जगात नवी ओळख निर्माण झाली. त्याचा मला अभिमान वाटतो,’ असे मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांनी शनिवारी येथे व्यक्त केले.
डेक्कन चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीकल्चर (डीसीसीआयए) तर्फे आयोजित वार्षिक पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते. त्रिपुराचे राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांच्या हस्ते डॉ. भटकर यांना त्यांनी केलेल्या कार्याबद्दल पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रकाश आमटे यांना त्यांच्या सामाजिक सेवेसाठीचा पुरस्कार, प्रसिद्ध उद्योगपती व ‘आरएसबी ग्रुप’ चे अध्यक्ष आर. के. बेहरा यांना ‘जीवनगौरव पुरस्कार,’ सुदर्शन केमिकल इंडस्ट्रीजचे कार्याध्यक्ष के. एल. राठी यांना ‘सवरेत्कृष्ट उद्योगपती पुरस्कार, देण्यात आला.
याबरोबरच सवरेत्कृष्ट सुरक्षा व्यवस्थेसाठीचे पुरस्कार मेटल व माइनिंग विभागात इसार स्टील इंडिया लि., ऑटोमोबाईल विभागात जॉन डीअर इंडिया प्रा. लि. आणि केमिकल विभागात डाऊ कॉर्निग इंडिया प्रा. लि. व उपविजेती म्हणून केमिताल-राय इंडिया लि. यांना देण्यात आले. याप्रसंगी ‘डीसीसीआयए’चे अध्यक्ष चंदू चव्हाण, उपाध्यक्ष एच. पी. श्रीवास्तव, सचिव रथिन सिन्हा व खजिनदार सुरेन अगरवाल उपस्थित होते. डॉ. आमटे व बेहरा उपस्थित राहू न शकल्याने त्यांच्या वतीने अनुक्रमे अनिकेत आमटे व रजनीकांत बेहरा यांनी पुरस्काराचा स्वीकार केला.
डॉ. भटकर म्हणाले, ‘‘सुरुवातीच्या काळात इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील ३०० कोटी असलेली उलाढाल आज ८ लाख कोटी रुपयांवर गेली आहे. त्याचा देशाच्या एकूण उत्पन्नात १० टक्के वाटा असून २१ व्या शतकात या क्षेत्रामध्ये भारताचे वर्चस्व राहील.’’
याप्रसंगी ‘स्पर्श’ या विशेषांकाचे प्रकाशन डॉ. पाटील यांच्या हस्ते झाले.