परेश रावल, पं.जसराज, बंग दांपत्य यंदाचे पुलोत्सव पुरस्कारांचे मानकरी Print

प्रतिनिधी
चित्रपट, नाटय़, संगीत, साहित्य व कलेचा उत्सव असणाऱ्या पुलोत्सवात दिल्या जाणाऱ्या पुरस्काराची घोषणा नुकतीच करण्यात आली. ‘पु.ल.स्मृती पुरस्कार’ यंदा अभिनेते परेश रावल यांना, ‘पुलोत्सव जीवन गौरव पुरस्कार’ ज्येष्ठ शास्त्रीय गायक पंडित जसराज यांना, तर ‘पुलोत्सव : कृतज्ञता पुरस्कार’ यावर्षी डॉ. अभय बंग व राणी बंग यांना प्रदान करण्यात येणार आहे. रोख रक्कम ५१ हजार रुपये, स्मृतिचिन्ह, मानपत्र, पुणेरी पगडी असे सर्व पुरस्कारांचे स्वरूप आहे.
जागतिक रंगभूमीदिनाचे औचित्य साधून ५ नोव्हेंबर रोजी या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती, पुलोत्सवाचे संयोजक वीरेंद्र चित्राव यांनी दिली. आधुनिक रंगभूमीच्या प्रवर्तक विजया मेहता यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारा ‘विजायाबाई आणि आपण’ महोत्सव हे या पुलोत्सवाचे विशेष आकर्षण ठरणार आहे. यावेळी विजयाबाईंच्या ‘झिम्मा’ या पुस्तकाचे प्रकाशन, त्या पुस्तकाचे अभिवाचन करण्यात येणार आहे. या निमित्ताने विजयाबाईंची विशेष मुलाखतही घेतली जाणार आहे. तसेच विजयाबाईंवरील लघुपट, स्मृतिचित्रे, त्याचप्रमाणे वाडा चिरेबंदी, हयवदन, हमीदाबाई की कोठी या नाटकांच्या दृश्यफिती पाहण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे.