महिलांनो सावधान.. गाडी लांबविणाऱ्या ‘मेकॅनिक’पासून! Print

प्रतिनिधी
‘तुमच्या दुचाकीच्या चाकाचा नट ढिला झालाय, तुम्ही पडाल. मी मॅकेनिक आहे, गाडी दुरुस्त करून देतो,’ असे सांगत एखादा ‘मेकॅनिक’ जवळ आला तर.. महिलांनो सावधान! कारण हाच मेकॅनिक ‘ट्रायल बघतो’ म्हणून दुचाकी घेऊन पसार होईल. तो तुमच्या दुचाकीच्या डिकीतून वस्तू काढून घेईलच, शिवाय त्याच दुचाकीचा वापर करून पुढच्या कोणत्या तरी महिलेला असाच गंडा घालेल..
पुण्यात रविवारी दोन महिलांना अशा प्रसंगाला सामोरे जावे लागले. अप्पा बळवंत चौकातून अशा प्रकारे दुचाकी लांबविणाऱ्या ‘त्या’ मेकॅनिकने गुलटेकडी येथे जाऊन दुसऱ्या महिलेला अशाच पद्धतीने फसविले.. तेसुद्धा आधी पळविलेल्या दुचाकीचा वापर करून!
कोंढवा बु. येथील भावना भंडारी व बुधवार पेठेत राहणाऱ्या रूपाली मुंजे यांनी याबाबत पोलीस ठाण्यात तक्रारी दिल्या आहेत. त्यावरून स्वारगेट व विश्रामबाग पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. रूपाली मुंजे या सकाळी नऊच्या सुमारास बुधवार पेठेतून केळकर रस्त्याने दुचाकीवरून कामाच्या निमित्ताने जात होत्या. अप्पा बळवंत चौकात त्या सिग्नलला थांबल्या असता मोटारसायकलवर बसलेल्या एका व्यक्तीने तुमच्या दुचाकीच्या पाठीमागील चाकाचा नट सैल झाला आहे. तो तुम्हाला आवळून देतो असे सांगून मुंजे यांचा विश्वास संपादन केला. चाकाचा नट आवळल्यासारखे करून दुचाकी व्यवस्थित चालते का याची ट्रायल घेतो, असे सांगून ती घेऊन गेला तो परत आलाच नाही. त्याने चोरलेल्या त्या दुचाकीतील सर्व वस्तू काढून पुढे  गुलटेकडी येथे अशाच पद्धतीने भंडारी यांना फसविण्यासाठी याच दुचाकीचा वापर केला. भंडारी या सकाळी सव्वाअकराच्या सुमारास डायस प्लॉटकडून बिबवेवाडीकडे दुचाकीवरून जात होत्या. गुलटेकडी येथील नेहरू रस्त्यावर त्यांना पाठीमागून येऊन त्याच व्यक्तीने ‘तुमच्या स्कूटरच्या पाठीमागील चाकाचे नटबोल्ट सैल झाले आहेत. मी स्कूटर मॅकेनिक असून तुमची स्कुटर दुरुस्त करून देतो,’ असे सांगितले. भंडारी यांच्याकडून त्यांच्या स्कूटरची चावी घेऊन ती दुरुस्त केल्याचा बहाणा केला. दुचाकी चालू करून व्यवस्थित चालते का हे पाहतो म्हणून स्कूटर घेऊन गेला. त्याही स्कूटरच्या डिकीमध्ये असलेला मोबाईल, पर्स तसेच इतर वस्तू काढून ती दुचाकी पुढे मार्केट यार्ड येथे सोडल्याचे आढळून आले आहे. दोन्ही घटनांमधील व्यक्ती या साधारण तीस ते पस्तीस वयोगटातीलच आहेत. एकाच व्यक्तीने हा प्रकार केला असावा असा पोलिसांचा अंदाज असून त्याने पहिल्या ठिकाणीही एक दुचाकी सोडली आहे.