‘साहेब’ म्हणतात, पाण्याचे राजकारण करू नका; मात्र राष्ट्रवादीकडूनच आळंदीत ‘पाण्याचे राजकारण’ Print

पिंपरी / प्रतिनिधी ,मंगळवार, २३ ऑक्टोबर २०१२
alt

पाण्याचे राजकारण करू नका, असे आवाहन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या पुण्यातील अधिवेशनात केले. मात्र, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार ‘कारभारी’ असलेल्या पिंपरी पालिकेनेच पक्षीय राजकारणातूनच आळंदीला पिण्यासाठी पाणी देण्यास स्पष्टपणे नकारघंटा दिली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कथनी व करणीतील फरक उघडपणे दिसून आला आहे.
‘तीर्थक्षेत्र’ आळंदीला पिण्याचे पाणी देऊ, अशी घोषणा पालिकेने केली होती. मात्र, नंतर घूमजाव करत याबाबतचा प्रस्ताव वर्षभर झुलवत ठेवला आणि कोणतीही चर्चा न करता फेटाळूनही लावला. जवळपास तीन वर्षांपासून आळंदीकर पाण्यासाठी पाठपुरावा करत होते. त्यांनी अजितदादांसह राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडे सातत्याने हेलपाटे मारले, अधिकाऱ्यांना निवेदने दिली, नगरसेवकांना साकडेही घातले. मात्र, वर्षभर टाळाटाळ करीत आम्हालाच पाणी नाही आणि तुम्हाला कुठून देऊ, असे कारण देत राष्ट्रवादीने हात झटकले. त्यामुळे आळंदीकर संतापले. आळंदीत माणसे राहात नाहीत, जनावरे राहतात का, पालिका पाणी देणार होती म्हणजे मेहेरबानी करणार नव्हती. आम्ही त्याचे पैसे देणार होतो. महापालिका त्यांच्याकडील घाण पाणी इंद्रायणीत सोडते, त्यामुळेच इंद्रायणी प्रदूषित झाली, अशा संतप्त भावना आळंदीच्या लोकप्रतिनिधींनी वेळोवेळी व्यक्त केल्या. येथील विरोधी पक्षनेते व राष्ट्रवादीचे आघाडीचे नगरसेवक डी. डी. भोसले यांनी, आम्ही राष्ट्रवादीसाठी बरेच काही केले. मात्र, आमच्याच नेत्यांनी दिलेली वागणूक व माऊलींच्या गावात पाण्यावरून केलेला ‘खेळ’ पाहिल्यानंतर राष्ट्रवादीचे म्हणवून घेण्याची लाज वाटते, अशी कडवट प्रतिक्रिया व्यक्त केली होती. चऱ्होलीत शरद पवार यांच्या नावाने असलेल्या खासगी शाळेला पाणी दिले जाते, मात्र आळंदीला नाकारले जाते, याकडेही त्यांनी लक्ष वेधले होते.
भामा आसखेडचे काम पूर्ण झाल्यानंतर आळंदीच्या पाण्याचा प्रश्न सुटणार असल्याने आम्हाला कायमचे पाणी नको आहे. आळंदीत राज्यभरातून भाविक येतात. किमान यात्रांच्या काळापुरते पिंपरी पालिकेने पाणी द्यावे, असेही नगरपरिषदेने म्हणून पाहिले. राष्ट्रवादीला पाणी द्यायचेच नव्हते. मात्र, नाराजी नको म्हणून थेट विषय नामंजूर करण्याऐवजी ते तहकुबीचा खेळ करत राहिले. किरकोळ गोष्टीही अजितदादांना विचारूनच करण्याची पिंपरी महापालिकेची पध्दत आहे. त्यामुळे पाणी नाकारण्याचा निर्णयही त्यांच्या आदेशानुसारच घेतल्याचे मानले जाते. आम्हाला पिण्यास पुरेसे पाणी नाही. त्यामुळे इतरांना पाणी देण्याचा विषयच येत नाही, अशी सारवासारव राष्ट्रवादीकडून करण्यात येते. मात्र, पुण्यातही पाण्याची कपात असताना दौंडला पाणी सोडण्यात आले, याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करण्यात येते. त्यातच साहेबांनी पाण्याच्या विषयात राजकारण नको असे आवाहन केले असून आळंदीच्या बाबतीत मात्र राष्ट्रवादीची भूमिका वेगळीच असल्याचे स्पष्टपणे दिसून येते.