संक्षिप्त Print

‘कोलाज’ पुस्तकाचे प्रकाशन
‘हृद्गंध’ या संस्थेच्या वतीने ‘कोलाज’ या पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ व्यंगचित्रकार व लेखक मंगेश तेंडुलकर आणि सुप्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. अमेय पांगारकर, अदिती पटवर्धन आणि वैष्णवी संभूस यांनी या पुस्तकाचे लेखन केले असून शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, उज्ज्वल निकम, पं.हृदयनाथ मंगेशकर, अच्युत गोडबोले आदी दिग्गजांच्या विविध पैलूंची ओळख या पुस्तकाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. या वेळी स्वलिखित कविता आणि गाण्यांचा ‘कधी वाटते’ हा कार्यक्रमही सादर करण्यात आला. पक्षितज्ज्ञ किरण पुरंदरे, संगणकतज्ज्ञ दीपक शिकारपूर, मुकुंद भालेराव, देवेंद्र भोमे आदी या प्रसंगी उपस्थित होते.
जनसेवा बँकेच्या फुरसुंगी शाखेचे उद्घाटन
जनसेवा सहकारी बँकेच्या फुरसुंगी येथील शाखेचे उद्घाटन नुकतेच विधानसभेचे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्या हस्ते करण्यात आले. ग्राहक, संचालक आणि कर्मचारी यांच्या एकमेकांवरील विश्वासावरच बँकांची प्रगती होत असते, असे मत खडसे यांनी या वेळी व्यक्त केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत सहसंघचालक नाना जाधव, बँकेचे अध्यक्ष अॅड. सतीश गोरडे, उपाध्यक्ष बाळासाहेब कचरे, फुरसुंगी शाखेचे पालक संचालक पांडुरंग गायकवाड आदी या वेळी उपस्थित होते.
‘पुनवडी जत्रे’ चे आयोजन
मानसी महिला उन्नती केंद्रातर्फे महिला बचत गटांच्या ‘पुनवडी जत्रे’ चे २६ ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजन करण्यात आले आहे. या जत्रेचे उद्घाटन २६ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांच्या हस्ते होणार आहे. बचत गटातील महिलांना प्रोत्साहन देणे आणि बचत गटाच्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या हेतूने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
अध्यक्षपदी जीवन हेंद्रे
श्री तुळशीबाग नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी जीवन हेंद्रे यांची निवड झाली आहे. उपाध्यक्षपदी सुनील कावरे व सचिवपदी नितीन पंडित यांची निवड करण्यात आली आहे. तर सहसचिवपदी किरण चौहान यांची आणि खजिनदारपदी गणेश रामलिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कार्यकारी संचालकपदी गणेश देव यांची निवड केली आहे.
उपचारासाठी मदतीचे आवाहन
रिटा प्रसाद (वय ४०) यांना २८ सप्टेंबर रोजी झालेल्या अपघातात जबर मार लागल्याने त्यांच्यावर चंदननगर, खराडी येथील रक्षक रुग्णालयात उपचार सुरू आहे. त्यांच्या उपचारासाठीचा अंदाजे खर्च २ लाख ५० हजार इतका असून त्यांचे कुटुंब हा खर्च पूर्ण करण्यास असमर्थ आहे. तरी इच्छुकांनी आपली मदत स्टेट बँक ऑफ इंडिया खाते क्रमांक २००४०५१३९५८ या क्रमांकावर पाठवावी. अधिक माहितीसाठी संपर्क- ८९२८२२९७१६, ८९२८२३३६४२.
‘जनजागरण अभियानाचे’ आयोजन
छावा मराठा युवा संघटनेतर्फे मराठा अरक्षणासह महाराष्ट्रातील पाणी प्रश्नासारख्या प्रश्नांवर प्रकाश टाकण्यासाठी ‘जनजागरण अभियानाचे’ आयोजन केले आहे. या अभियानादरम्यान विद्यार्थ्यांची शिक्षण संस्थांकडून होणारी अर्थिक लूट थांबवण्यात यावी, मराठा आरक्षणाच्या मागणीवर विचार करून सरकारनी त्याबाबत ठोस पावले उचलावीत आदी मागण्या करण्यात येणार आहे. हे अभियान १५ नोव्हेंबर रोजी औरंगाबाद येथून सुरू होणार असून १४ मे रोजी पुण्यात सांगता होणार आहे.
‘अवैध गोहत्या थांबवावी’
बकरी ईदच्या दिवशी होणारी अवैध गोहत्या थांबवावी अशी मागणी अखिल भारतीय कृषी गो-सेवा संघातर्फे सरकारला करण्यात आली. दिवसेंदिवस कमी होणाऱ्या पशुधनाचा विपरीत परिणाम कृषि क्षेत्रावर होत आहे. अशा वेळी महाराष्ट्रात होणारी ही अवैध गोहत्या लवकरात लवकर थांबवण्यात यावी, यासाठी गो-माफियांविरोधात कठोर कारवाई करावी अशी मागणी संघातर्फे करण्यात आली आहे. तसेच सरकारने काढलेल्या अवैध गोवंश हत्या रोखणाऱ्या परिपत्रकाची अंमलबजावणी करून डांबून ठेवलेले गोवंश मुक्त करून गोशाळेत पाठवावे अशीही मागणी संघाने केली आहे.