लष्करी जवानांनी घेतले दगडूशेठ गणपतीचे दर्शन Print

प्रतिनिधी
लष्कराच्या पायदळातील ‘१० महार’ बटालियनच्या २५० जवानांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरास भेट देऊन गणरायाला सलामी दिली. बटालियनच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त या सैनिकांनी ‘श्रीं’चे दर्शन घेतले. सर्व सैनिकांनी गणरायाचा जप करीत गणेशाचे पूजन व आरती केली.
या सुवर्णमहोत्सवानिमित्त १६ ते १८ नोव्हेंबर दरम्यान बटालियनमध्ये विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. तसेच, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने बटालियनच्या सैनिकांचा १८ नोव्हेंबर रोजी गौरव करण्यात येणार आहे. या वेळी बटालियनला शौर्यपत्र देण्यात येणार आहे. हुतात्मा जवानांच्या वीरमाता, वीरपत्नी यांचा प्रत्येकी २५ हजार रुपये रोख, साडीचोळी देऊन पुणेकरांच्या वतीने हुतात्म्यांना मानवंदना देण्यात येणार आहे. या प्रसंगी, बटालियनचे प्रमुख कर्नल थापा, लेफ्टनंट कर्नल जयस्वाल, मेजर महेंद्र, ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, कोशाध्यक्ष महेश सूर्यवंशी आदी उपस्थित होते.