विधिमंडळाच्या अमृतमहोत्सवानिमित्त पुण्यामध्ये परिसंवादाचे आयोजन Print

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ९ नोव्हेंबरला उद्घाटन
प्रतिनिधी
महाराष्ट्र विधिमंडळाचे अमृतमहोत्सवी वर्ष आणि आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी सोहळय़ानिमित्त पुण्यातील येत्या ९ नोव्हेंबर रोजी ‘उद्योग’ विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. हा परिसंवाद विधान भवन परिसरात होणार असून, त्याचे उद्घाटन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे. विधिमंडळाचे प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे यांनी याबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले, की या कार्यक्रमासाठी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाचे पीठासीन अधिकारी, उपपीठासीन अधिकारी, विरोधी पक्षनेते, राज्यातील केंद्रीयमंत्री, राज्याचे मंत्री, आजी-माजी संसद सदस्य, विधिमंडळाचे आजी-माजी सदस्य, पुणे महसुली विभागातील, महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांचे अनुक्रमे महापौर, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती यांच्यासह सर्व नगरसेवक, वरिष्ठ शासकीय अधिकारी यांना निमंत्रित केले जाणार आहे. या परिसंवादाच्या ठिकाणीच विधान मंडळाच्या अमृतमहोत्सवानिमित्त तयार करण्यात आलेले प्रदर्शनही उभे केले जाणार आहे.