‘काश्मीरप्रश्न हा मतांसाठी राष्ट्रहित विकल्याचा परिणाम’ Print

प्रतिनिधी
‘‘काश्मीरची आजची अवस्था ही मतांसाठी राष्ट्रहीत विकल्याचा परिणाम असून याला कोणताही राजकीय पक्ष अपवाद नाही. काश्मीरप्रश्नाचे उत्तर हे दिल्लीत आहे, काश्मीरमध्ये नाही, पण काश्मीरप्रश्नावर दिल्लीला उत्तरच नको आहे,’’ असे मत खासदार तरूण विजय यांनी रविवारी मोरया प्रकाशनच्या रौप्यमहोत्सव समारंभात व्यक्त केले.
या वेळी मोरया प्रकाशनच्यावतीने जगमोहनलिखित ‘काश्मीर धुमसते बर्फ’, चं. प. भिशीकर लिखित ‘गोष्टी आपल्या सुख-दुखाच्या’ आणि उद्धव कुलकर्णीलिखित ‘कर्म सिध्दांत’ या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार सुधीर जोगळेकर, प्रवचनकार सुनील चिंचोलकर, ज्येष्ठ लेखक सच्चिदानंद शेवडे, अनिल सरोदे, उद्धव कुलकर्णी आणि दिलीप महाजन उपस्थित होते.
यावेळी तरूण विजय म्हणाले, ‘‘गेली अनेक वर्षे धुमसत असलेला काश्मीरप्रश्न हा विश्वासघात, सत्तांध नेत्यांनी केलेले राजकारण, संवेदनहीनता आणि सर्वच घटकांची निष्क्रियता यांचा परिणाम आहे. काश्मीरमध्ये आजही दोन ध्वज फडकवले जातात आणि त्यामध्ये आपल्याला काही वावगे वाटत नाही, या भारतीय मानसिकतेमुळे काश्मीरप्रश्न अधिक बिकट झाला आहे.’’
यावेळी जोगळेकर म्हणाले, ‘‘काश्मीरप्रश्न सोडवण्यासाठी भारताने जेवढे प्रयत्न करायला हवे होते, तेवढे केले नाहीत. किंबहुना मतांच्या राजकारणासाठी काश्मीर प्रश्न सुटावा असे कोणाला वाटतच नाही. कोणत्याही सरकारने त्यांच्या कार्यकाळात काश्मीर भागाला आणि काश्मीरप्रश्न सोडवण्याला महत्त्वच दिले नाही.’’