भोंडल्याच्या गाण्यांमधून वाडय़ातील आठवणींना उजाळा! Print

प्रतिनिधी
वाडा संस्कृती अभियानातर्फे वाडावासीयांचा मेळावा आणि नवरात्री भोंडला असा कार्यक्रम शुक्रवार पेठेतील बारी वाडय़ाच्या अंगणात सोमवारी पार पडला. भोंडल्याच्या गाण्यांमधून आणि खिरापतीच्या वैविध्यातून वाडय़ाच्या अनेक आठवणी या वेळी जाग्या झाल्या.
वाडा संस्कृती अभियानातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आमदार गिरीश बापट, तसेच अभियानाचे अध्यक्ष दीपक रणधीर, भाजपचे बापू नाईक, नामदेव माळवदे, शोभा गोखले, कल्पना जाधव, शकुंतला आवटे, माधुरी पाठक, राधिका कुलकर्णी, वैजयंती ढवळे आदींची या वेळी प्रमुख उपस्थिती होती. बारी वाडय़ातील रहिवाशांबरोबरच परिसरातील वाडय़ांमध्ये पूर्वी राहणारे अनेक नागरिकही कार्यक्रमाला उपस्थित होते. महिलांनी या वेळी पारंपरिक पद्धतीची गाणी म्हणत भोंडला केला. या भोंडल्याने वाडय़ातील अनेक जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. बारी वाडय़ात पूर्वी कसा भोंडला व्हायचा त्यावेळच्या आठवणी या वेळी सर्वाच्याच चर्चेत आल्या.
 वाडा संस्कृतीच्या भावनिक धाग्याची आठवण ठेवतानाच वाडय़ांमधील नागरी समस्या सोडविण्याचे प्रयत्न केले जातील, असे आश्वासन आमदार बापट यांनी या वेळी दिले.