बनावट पासपोर्टवर भारतात वास्तव्य ; नायजेरियन तरुणाला अटक Print

दोन वर्षांपासून राहात असल्याचे उघड
प्रतिनिधी
बनावट पासपोर्टवर भारतात येऊन व्यवसाय करणाऱ्या नायजेरियन व्यक्तीला कोरेगावपार्क पोलिसांनी अटक केली. बिझनेस व्हिसावर भारतात येऊन गेल्या दोन वर्षांपासून बेकायदेशीररीत्या व्यवसाय करत असल्याचे तपासात पुढे आले आहे. न्यायालयाने त्याला अधिक तपासासाठी दोन दिवस पोलीस कोठडी सुनावली.
बेंजामीन बाबा फेमीऑलन फेमी (वय ३८, रा. नायजेरिया) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. कोरेगावपार्क पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शिवाजी कांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, बेंजामीन हा कोरेगावपार्क येथील हॉटेल सूर्यव्हीला येथे राहण्यासाठी खोली पाहात होता. त्या वेळी येथे त्याचा पासपोर्ट तपासण्यात आला असता तो बनावट असल्याचे लक्षात आले. त्यामुळे कोरेगाव पार्क पोलिसांनी त्याला तत्काळ ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता २००५ मध्ये तो बिझनेस व्हिसावर भारतात आल्याचे सांगत आहे. तो भारतात लहान मुलांच्या कपडे विक्रीचा व्यवसाय करतो. त्याच्या पासपार्टची मुदत २०१० पर्यंत होती. त्यानंतर मुदत वाढविण्यासाठी त्याने बोगस कागदपत्रांचा वापर करुन बनावट पासपोर्ट तयार केला. गेल्या दोन वर्षांपासून तो या पासपोर्टवर भारतात राहत आहे. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने अधिक तपासासाठी दोन दिवस पोलीस कोठडी सुनावली.