पुस्तके वाचकांपर्यंत नेण्यात आम्हीच कमी पडतो- रमेश राठिवडेकर Print

‘अक्षरधारा’ चळवळीची १८ वर्षे पूर्ण
प्रतिनिधी
वाचन संस्कृती आटली असल्याचा सूर विविध साहित्यिक कार्यक्रमांतून आळवला जात असला, तरी ही तक्रार मला मान्य नाही. वाचकांना पुस्तके हवी आहेत. पण, ही पुस्तके त्यांच्यापर्यंत नेण्यामध्ये आम्हीच कमी पडतो. चांगली सेवा दिली तर, वाचक आवर्जून पुस्तकांची खरेदी करतात असा अनुभव आहे. नवीन वाचकवर्ग घडविण्याची जबाबदारी लेखक, प्रकाशकांबरोबरच ग्रंथप्रदर्शनाच्या आयोजकांचीदेखील आहे, अशी भावना ‘अक्षरधारा’ चे रमेश राठिवडेकर यांनी मंगळवारी व्यक्त केली.
दर्जेदार साहित्यकृती प्रदर्शनांच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करणारी ‘अक्षरधारा’ चळवळ विजया दशमीच्या मुहूर्तावर बुधवारी (२४) १८ वर्षे पूर्ण करीत आहे. हे औचित्य साधून आचार्य अत्रे सभागृह येथे भरविण्यात येणाऱ्या ‘माय मराठी शब्दोत्सव’ या ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांच्या हस्ते होणार आहे. राज्य सरकारच्या भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले याप्रसंगी उपस्थित राहणार आहेत.
रमेश राठिवडेकर म्हणाले, ढवळे ग्रंथयात्रा संस्थेमध्ये आठ वर्षे काम करताना राज्यभरात १६० प्रदर्शने यशस्वी केली. तेथून बाहेर पडल्यानंतर १३ ऑक्टोबर १९९४ रोजी अक्षरधारा सुरू केली. केवळ प्रदर्शने भरविणे हे उद्दिष्ट न ठेवता वाचकांना आकर्षित करण्यासाठी या प्रदर्शनांना जोडून साहित्यिक-सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केल्यामुळे वाचकांची भूक भागविण्यामध्ये यश लाभले. अक्षरधारातर्फे सध्या एकावेळी दोन ठिकाणी प्रदर्शने भरविण्यात येतात. ही ताकद भविष्यात दुप्पट करण्याबरोबरच पुढील वर्षी दिल्लीमध्ये केवळ मराठी साहित्याचे भव्य प्रदर्शनाचे आयोजन करण्याचा मानस आहे.