यंदाच्या दिवाळीत ‘एसटी खरंच तुमच्या दारी’! Print

प्रवाशांसाठी १९३५ जादा बस सोडणार
प्रतिनिधी ,बुधवार, २४ ऑक्टोबर २०१२
एसटी महामंडळाने प्रवाशांना दिवाळीनिमित्त आगळी सुविधा देऊ केली आहे. प्रवाशांच्या थेट घरी बस नेऊन त्यांना बसवून घेतले जाणार आहे.. अट इतकीच की त्या एसटीमध्ये बसण्यासाठी ४५ प्रवासी उपलब्ध गोळा करण्याची जबाबदारी प्रवाशांची असेल. याचबरोबर दिवाळीनिमित्त ८ ते १३ नोव्हेंबर दरम्यान पुण्यातून राज्यातील विविध मार्गावर १९३५ जादा बसेस सोडण्यात येणार आहेत.
जर एका विशिष्ट ठिकाणी प्रवाशांच्या ४५ जणांच्या गटाला जायचे असेल, तर त्यांच्या सोयीप्रमाणे, त्यांना हव्या असलेल्या तारखेला, वेळेला आणि इच्छुक ठिकाणी एसटी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ही सुविधा यंदा प्रथमच अमलात आणण्यात येणार आहे, अशी माहिती एसटी महामंडळाच्या पुणे विभागाचे नियंत्रक अशोक जाधव यांनी दिली.
या वर्षी दिवाळीत स्वारगेट बसस्थानकातून ८४६, शिवाजीनगर स्थानकापासून २८९, पिंपरी-चिंचवड येथून १४१, तर पुणे स्टेशन स्थानकातून ५१ जादा एसटी बसेस सोडण्यात येणार आहेत. एसटीच्या पार्किंगसाठी पुरेशा जागेअभावी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानातून ९ ते १२ नोव्हेंबर या कालावधीत ६०८ एसटी बसेस सोडण्यात येतील. प्रवाशांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी सर्व एसटी स्थानकांवर मार्गदर्शन केंद्रे उपलब्ध करून देण्यात येतील. अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या आवारात फिरते शौचालय, पिण्याचे पाणी या सुविधांबरोबरच जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात येईल.
या गाडय़ांचे आरक्षण सर्व बसस्थानके तसेच, काही अधिकृत केंद्रांवरही करता येईल. यासाठी स्वारगेट (०२०-२४४४१५९१), शिवाजीनगर (२५५३६९७०), पुणे रेल्वे स्टेशन (२६०५३३८०), पिंपरी-चिंचवड (२७४२१८२७), डेक्कन जिमखाना (२५४२१६४९) या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. इंटरनेटद्वारे ६६६.े२१३ू१२.ू.्रल्ल या संकेतस्थळावर आगाऊ आरक्षण करता येईल. जादा गाडय़ांव्यतिरिक्त महामंडळातर्फे प्रथमच स्वारगेट-दादर-स्वारगेट या मार्गावर वातानुकूलित शिवनेरी गाडी १ नोव्हेंबरपासून सुरू करण्यात येणार आहे. या गाडीचे प्रवासी भाडे ३७० रुपये आहे. तसेच, शिवाजीनगर-शिर्डी-शिवाजीनगर या मार्गावरही दर बुधवारी व गुरुवारी वातानुकूलित शिवनेरी सेवा सुरू करण्यात आली आहे. या गाडीचे प्रवासी भाडे ४७७ रुपये असणार आहे, असेही जाधव यांनी सांगितले.