संक्षिप्त Print

रिपाइंतर्फे आनंद मेळावा
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पुणे शाखेच्या वतीने धम्मचक्र प्रवर्तनदिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी शिक्षण मंडळाचे सभासद बाळासाहेब जानराव यांच्या हस्ते आंबेडकरांच्या पुतळय़ास पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी  पुणे शहराध्यक्ष महेंद्र कांबळे, अशोक शिरोळे, युवक अध्यक्ष शैलेंद्र चव्हाण  उपस्थित होते. शहरातील सर्व परिवर्तनवादी पक्ष, संघटनांच्या वतीने धम्मचक्र परिवर्तनदिनानिमित्त धम्म अभियानाचे आयोजन करण्यात आले होते.  अभियानाचे प्रमुख प्रा. दि. वा. बागूल, दलित पँथर ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष बापूसाहेब भोसले, युवराज बनसोडे, योगेश पिंगळे उपस्थित होते.
दिलीप पारुळकर यांचा सन्मान
सैनिक मित्र परिवारातर्फे विजयादशमीनिमित्त ग्रुप कॅप्टन(निवृत्त)दिलीप पारुळकर यांचा सन्मान करण्यात आला. जैन सोशल ग्रुपच्या पुणे विभागाचे अध्यक्ष पृथ्वीराज धोका यांच्या हस्ते पुणेरी पगडी, तिरंगी उपरणे व स्मृतिचिन्ह देऊन पारुळकर यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी अशोक मेहेंदळे, विष्णू ठाकूर, भाई  ताम्हाणे आदी उपस्थित होते.
उपचारासाठी मदतीचे आवाहन
प्रमोद खेले (वय ४१) यांची किडनी फेल झाल्याने त्यांच्यावर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.डायलिसीस व अन्य उपचारांसाठी सुमारे एक लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. हा खर्च करण्यास त्यांचे कुटुंबीय पूर्णत: असमर्थ आहेत. तरी त्यांना मदत करण्यास इच्छुक असणाऱ्यांनी ९८५०६००९३४ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.
यलो रिबन एनजीओ फेअर
ईशान्य फाऊंडेशनद्वारे सामाजिक संस्थांसाठी २६ ते २९ ऑक्टोबर या दरम्यान ईशान्य मॉल येथे ‘यलो रिबन एनजीओ फेअर’चे आयोजन करण्यात आले आहे. यंदाच्या फेअरचा मुख्य विषय ‘इकॉलॉजी टू इकॉनॉमी’ असा असून प्रसिद्ध समाजसेविका स्मिताबेन पारेख  यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात येणार आहे.  या फेअरमध्ये विविध सामाजिक संस्थांनी बनविलेल्या पैठणी, दागिने, मिठाई, शुभेच्छापत्रे, तोरणे, पणत्या, आकाशकंदील विक्रीसाठी उपलब्ध आहेत.   
हिंदू युवा संगमचे आयोजन
देशातील युवकांसमोरील विविध समस्यांवर सखोल चर्चा करण्यासाठी राष्ट्रभक्त हिंदू युवक व संघटनांच्या वतीने २८ व २९ ऑक्टोबर रोजी ‘हिंदू युवा संगम’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याअंतर्गत ‘इतिहासाचे विकृतिकरण व धर्मनिरपेक्षता’, ‘गोविज्ञान गोसंवर्धन’, ‘हिंदुराष्ट्राची गरज’ आदी विषयांवर तज्ज्ञ मार्गदर्शन करतील. तसेच, मुघल गार्डनला ‘शिवशाही उद्यान’ असे नामकरण करावे, या मागणीसाठी निषेध मोर्चा काढण्यात येईल, अशी माहिती या कार्यक्रमाचे प्रमुख संजय जढर यांनी दिली.