कंपनी विकायची असल्याचे सांगून व्यापाऱ्याची दोन कोटींची फसवणूक Print

पुणे / प्रतिनिधी
पिंपरी येथील कंपनीची बँकेने जप्त केलेली मालमत्ता विकायची असल्याचे सांगून वाकड येथील एका व्यापाऱ्याला दोन कोटीचा गंडा घातला. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राईड असोसिएटसचे प्रवीण ईश्वर अगरवाल (वय ३९, रा. रामवाटिका आपटे कॉलनी, भोसरी) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यावरून चंद्रकांत काशिनाथ बेलवटे (रा. इंद्रप्रस्थ सोसायटी, चिंचवड) आणि इतर चारजणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अगरवाल यांच्या एका फर्मला प्लॉटची गरज होती म्हणून ते जागा शोधत होते. या दरम्यान बेलवटे हे अगरवाल यांना भेटले. बेलवटे यांनी अगरवाल यांना पिंपरी येथील फत्तेजा फोर्स कंपनीची जागा असल्याचे सांगून ती जागा बँक ऑफ महाराष्ट्रने जप्त केलेली असल्याचे सांगितले. हा प्लॉट मिळवून देतो असे बेलवटे यांनी अगरवाल यांना सांगितले. हा व्यवहार करण्यासाठी मार्च महिन्यात शिवाजीनगर येथील प्राईड हॉटेल येथे बैठक घेतली.  त्यावेळी अगरवाल यांना आरोपींनी मिळकतीची झेरॉक्स कागदपत्रे दाखविली. बँक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापक म्हणून बेलवटे याने एका व्यक्तीची अगरवाल यांच्याशी ओळख करून दिली. अगरवाल यांचा विश्वास संपादन करून ही मिळकत बँकेकडून सोडवून घेण्यासाठी दोन कोटीचा धनादेश दिला. मात्र, आरोपींनी तो महाराष्ट्र बँकेत न वटविता दुसऱ्या बँकेत वटविला. अगरवाल यांना मिळकतीची बनावट कगदपत्रे देऊन फसवणूक केली. या प्रकरणी पोलीस निरीक्षक पंढरीनाथ पाटील हे तपास करत आहेत.