सत्तावीस लाखांच्या मालाचा टेम्पो पळवून नेल्याप्रकरणी तिघांना अटक Print

शिरूर /वार्ताहर
रांजणगाव येथील चामडिया वेअर हाऊस या ठिकाणाहून आयटीसी कंपनीच्या सुमारे २७ लाख ५१ हजार रुपयांच्या सिगारेट व खाद्यपदार्थ यांनी भरलेला टेम्पो पळवून नेल्या प्रकरणातील तीन आरोपींना शिरूर पोलिसांनी बीड जिल्ह्य़ात अटक केली. त्यांच्याकडून टेम्पो व टेम्पोतील माल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.
दीपक अशोक अंकुशे (वय २८, मूळ रा. केज जिल्हा- बीड, सध्या रा. ढोकसांगवी. ता. शिरूर ), सुनील अर्जुन चौगुले (रा. १२ नंबर पाटी लातूर, सध्या रा. ढोकसांगवी) आणि दत्ता नरहरी चाळक (वय ३५, रा. लव्हुरी ता. केज, जि. बीड सध्या रा. ढोकसांगवी ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तिघांनाही अधिक तपासासाठी न्यायालयाने २९ ऑक्टोबपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
या बाबतची माहिती देताना शिरूरचे पोलीस निरीक्षक अशोक क्षीरसागर यांनी सांगितले की,  शिरूरजवळील सोनेसांगवी येथील दिलीप ढेरंगे यांच्या मालकीच्या टेम्पोवर अंकुशे हा चालक म्हणून काम करत होता. १४ ऑक्टोबर २०१२ ला सकाळी ६ वाजता चमडिया वेअर हाऊसमधून २७ लाख ५१ हजार रुपये किमतीच्या आयटीसी कंपनीच्या सिगारेट व खाद्यपदार्थ यांची नांदेड व धर्माबाद येथे डिलिव्हरी देण्याकरिता दीपक अंकुशे टेम्पो घेऊन गेला. या मालाची डिलिव्हरी न देता त्याने परस्पर अपहार केला होता. या प्रकरणी वेअर हाऊसचे अधिकारी सीताराम सोनार यांनी तक्रार नोंदविली होती. या प्रकरणातील दत्ता चाळक याच्या शेतात आरोपींनी माल लपवून ठेवला होता. पोलीस उपनिरीक्षक महेश स्वामी यांच्या पथकाने आरोपींना पकडले.