कारखान्यांनी ऊसदराची स्पर्धा थांबवावी- मुख्यमंत्री Print

नारायणगाव / वार्ताहर
alt

उसाच्या बाजारभावाच्या स्पर्धेमुळे साखर कारखानदारी अडचणीत येण्याची शक्यता असल्याने कारखान्यांनी ऊसदराची स्पर्धा थांबवावी, असा सल्ला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी निवृत्तीनगर (ता. जुन्नर) येथे दिला. ठिबक सिंचन योजनेमुळे उसाचे उत्पादन वाढणार असल्याने ठिबक सिंचनासाठी सबसिडी मिळण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली.जुन्नर तालुक्यातील श्री विघ्नहर सहकारी कारखान्याच्या सन २०१२-१३ च्या २७ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ आणि १२ मेगावॅट सहवीज निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी आयोजित सभेच्या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील हे होते. साखर उद्योगापुढे मोठी आव्हाने निर्माण झाली असून, दुष्काळात उसाचे उत्पादन घटले असून पुढील वर्षी ४० टक्के साखरेचे उत्पादन घटणार आहे. उसाची कमतरता असल्याने अनेक कारखाने बंद ठेवावे लागण्याचे गंभीर संकट उभे राहिले आहे. राज्यातील ६१ साखर कारखान्यांना १ हजार मेगावॅट वीज निर्मितीची परवानगी दिली असल्याने सहवीज निर्मिती प्रकल्पांमुळे शेतकरी व शासन यांना दुहेरी फायदा होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. हर्षवर्धन पाटील म्हणाले की, श्री विघ्नहर सहकारी साखर कारखाना हा राज्यातील १० अग्रेसर कारखान्यांमध्ये अग्रगण्य आहे. शासनाने २ वर्षांत ५ हजार कोटींची गुंतवणूक सहवीज निर्मिती प्रकल्पांसाठी केल्याने उसाला चांगला भाव मिळेल.  प्रास्ताविक करताना विघ्नहर अध्यक्ष सोपानशेठ शेरकर म्हणाले की, कारखान्याच्या माध्यमातून ठिबक योजनेसाठी शेतकऱ्यांना बिनव्याजी ४० हजार रुपये दिले जातात. शासनाने ठिबक योजनांसाठी ५० टक्के अनुदान द्यावे, धरणाच्या पाणी वाटप नियोजन समितीमध्ये कारखान्याला प्रतिनिधीत्व द्यावे, साखर कारखान्यांवरील इन्कमटॅक्स रद्द करण्यात यावा अशा मागण्या केल्या.आमदार बेनके, खासदार आढळराव यांनी आपल्या भाषणात विविध मागण्या मुख्यमंत्र्यांपुढे मांडल्या.