दसऱ्याच्या मुहुर्तावरही वादळी पावसाने झोडपले Print

प्रतिनिधी
गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरणाचा अनुभव घेतल्यानंतर पुणे शहरासह पिंपरी-चिंचवड परिसरात बुधवारी दसऱ्याच्या मुहुर्तावर मुसळधार पावसाने झोडपले. रात्री आठच्या सुमारास सुरू झालेला पाऊस तब्बल पाऊस तास सुरू होता. पुणे वेधशाळेत त्याची १६.८ मिलिमीटर इतकी नोंद झाली.
परतीच्या मान्सूनने राज्यातून माघार घेतल्यानंतर शहरासह राज्यातील तापमानात चांगली घट झाली होती. अनेक ठिकाणी सरासरीच्या खाली तापमान गेल्यामुळे थंडीची चाहूल लागली होती. मात्र, सध्या दक्षिण अरबी समुद्रात तीव्र कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून ते पश्चिम दिशेला सरकत आहे. त्यामुळे राज्याच्या बहुतांश भागात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ हवामान होते. काही भागात मंगळवारी व आज दिवसभरात तुरळक पाऊसही झाला. शहरात आज दिवसभर ढगाळ वातावरण होते. रात्री आठच्या सुमारास शहरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. शहराचा मध्य भाग, सिंहगड रस्ता, जंगलीमहाराज रस्ता, स्वारगेट, कात्रज, पिंपरी-चिंचवड, कोथरूड, वारजे परिसरात जोरदार पाऊस झाला. दसऱ्याला बाहेर पडलेल्या नागरिकांची अचानक आलेल्या पावसामुळे तारांबळ उडाली. पावसामुळे रस्त्यावर पाणी साचले होते. त्यामुळे काही ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली होती. पावसामुळे शहरात सहा ठिकाणी झाडांच्या फांद्या पडल्याच्या घटना घडल्या. पर्वती पायथ्याजवळ विजेच्या तारा तुटल्या. मात्र, त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. येत्या २४ तासांत वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे, असा अंदाज पुणे वेधशाळेतर्फे व्यक्त करण्यात आला
आहे.