सोन्याचे वाढलेले भाव विसरून ग्राहकांनी दसऱ्याचा मुहूर्त गाठला Print

प्रतिनिधी
alt

गेल्या काही दिवसांत सोन्याच्या भावाने दहा ग्रॅमसाठी तीस हजारांखालचा आकडा पाहिलेला नाही. मात्र याचा ग्राहकांच्या खरेदीवर काहीही परिणाम झाला नसून, दसऱ्याचा मुहूर्त गाठण्यासाठी ग्राहकांनी सोन्याच्या भावाची पर्वा न करता आज सराफी दुकानांत तुडुंब गर्दी केली.
या मुहूर्तावर केवळ सोन्याची वेढणीच नव्हे तर दागिने खरेदीलाही ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद असल्याचे ‘रांका ज्वेलर्स’ चे फतेचंद रांका यांनी सांगितले. आज सकाळपासूनच ग्राहकांनी दुकानात खरेदीसाठी खचाखच गर्दी केल्याचे ते म्हणाले. संध्याकाळी तर या गर्दीने कळस गाठला. धार्मिक सणांचा मुहूर्त चुकू नये म्हणून ग्राहक सोन्याचे भाव विसरून खरेदी करीत आहेत.
अनेक सराफी दुकानांनी सणाचे निमित्त साधून सोन्याच्या खरेदीवर कोणती ना कोणती सवलत योजना सुरू केली आहे. काही दुकाने ग्राहकांना ठराविक किमतीच्या सोन्याच्या खरेदीवर काहीतरी भेटवस्तू किंवा सूट देत आहेत. तर काही दुकानांनी ‘इतर कुठल्या दुकानात सोने आमच्यापेक्षा स्वस्त मिळते ते दाखवा’ असे आव्हान देणारी योजनाच ग्राहकांसमोर ठेवली आहे. या योजना ग्राहकांना मोठय़ा प्रमाणावर आकर्षित करीत असल्याचे ‘राजमल लखीचंद ज्वेलर्स’ चे प्रितेश मेहता यांनी सांगितले. दसऱ्याच्या मुहूर्तावर केवळ सोनेच नव्हे, तर चांदी आणि खडय़ांच्या दागिन्यांनाही ग्राहकांचा तेवढाच प्रतिसाद मिळत असल्याचे मेहता म्हणाले.