पुरंदरे वाडय़ातील शस्त्रपूजनाने ऐतिहासिक आठवणींना उजाळा Print

प्रतिनिधी
alt

दसऱ्याच्या मुहूर्तावर पूर्वी फौजा लढाईसाठी सीमा ओलांडून बाहेर पडायच्या.. भले मोहीम नंतर असली, तरी शीलंगणाचा मुहूर्त मात्र विजयादशमीला व्हायचा.. म्हणून शीलंगणाचे महत्त्व.. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे इतिहास जागा करत होते.. आणि त्याबरोबरच जुन्या, ऐतिहासिक महत्त्व लाभलेल्या अनेक शस्त्रांचीही माहिती उत्साहाने देत होते.. दसऱ्यानिमित्त पुरंदरे वाडय़ावर बुधवारी सकाळी शस्त्रपूजनाला उपस्थित असलेल्यांना हा अनुभव मिळाला.
बाबासाहेबांच्या पर्वती येथील वाडय़ावर बुधवारी सकाळी वाडय़ातील सारी पारंपरिक शस्त्रास्त्रे पूजनासाठी मांडण्यात आली होती. पारंपरिक शस्त्रांबरोबरच साहसी क्रीडाप्रकारांसाठी लागणारी विविध साधनेही या पूजेत होती. सुरुवातीला बाबासाहेबांनी दसऱ्याचे, शीलंगणाचे महत्त्व उपस्थितांना सांगितले. त्यानंतर पूजेतील शस्त्रांची माहिती देत त्यांनी त्या शस्त्रांचा इतिहास आणि महत्त्वही सांगितले. शीलंगणासाठी पूर्वी दसऱ्याचे विशेष महत्त्व होते. फौजा या दिवशी सीमा ओलांडून बाहेर पडायच्या. मोहिमेचा मुहूर्त या दिवशी व्हायचा. सुवासिनी फौजांना औक्षण करायच्या, असा दसऱ्याचा इतिहास सांगतानाच आज भारत कोणावर आक्रमण करत नाही, याचाच आम्ही अभिमान बाळगतो, असा टोलाही बाबासाहेबांनी लगावला.
मांडण्यात आलेली अनेक शस्त्रे पूर्वापार पुरंदरे घराण्यात होती. मलाही शस्त्रे जमविण्याचा छंद आहे, व्यसनच आहे हे. त्यामुळे मीदेखील काही शस्त्रे खरेदी केली. तरीही हा सारा संग्रह माझा आहे, अशी माझी धारणा नाही. हा आपल्या राष्ट्राचा संग्रह आहे. धैर्य आणि शौर्य जागविणाऱ्या शस्त्रांचे महत्त्व मोठे आहे, असेही ते म्हणाले. बाबासाहेबांबरोबरच त्यांचा नातू नाथ यानेही या वेळी पारंपरिक पद्धतीने शस्त्रपूजन केले. मनसेचे सरचिटणीस अनिल शिदोरे, प्रसाद पुरंदरे यांची या वेळी प्रमुख उपस्थिती होती.
नक्षी असलेली सोन्याची खांडा तलवार, हस्तीदंताच्या मुठी असलेल्या तलवारी, बंदुका, बच्र्या, भाले, तलवारी, वाघनखे आदी अनेक शस्त्रांची माहिती या वेळी बाबासाहेबांनी दिली. त्यातील एक तलवार साडेचारशे वर्षांपूर्वीची असून तिच्या मुठीला सिंहाचे तोंड आहे आणि मुठीवरील सिंहाच्या डोळय़ांत माणके बसवलेली आहेत. या आणि अशा अनेक शस्त्रास्त्रांची माहिती ऐकवताना बाबासाहेब आणि ऐकणारेही सारे रंगून गेले होते.