वाहनांचा वेग मोजणारी ‘स्पीडगन’ वाहतूक शाखेकडे नाही! Print

गेल्या काही वर्षांत एकही कारवाई नाही
प्रतिनिधी ,गुरुवार, २५ ऑक्टोबर २०१२
alt

शहरातील रस्त्यांवर ठरवून दिलेली वेगमर्यादा वाहने पाळतात की नाही हे मोजण्यासाठी लागणारे एकही ‘स्पीडगन’ उपकरण शहर वाहतूक शाखेकडे नसून, त्यामुळे बेफान वेगाने वाहने चालवणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांकडून गेल्या काही वर्षांत कारवाईच झालेली नाही. बेदररकार व बेभानपणे वाहन चालविण्याची क्रेझ तरुणाईमध्ये वाढल्यामुळे वाहनचालक व पादचाऱ्याच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
भरधाव वेगाने वाहन चालविणाऱ्यात दुचाकीस्वार पुढे असले तरी काही चारचाकी मोटारींचा वेगही मर्यादेपेक्षा अधिक असल्याचे दिसून येते. शहरात २०११ मध्ये विविध कारणांवरून झालेल्या अपघातामध्ये ४१७ जणांस आपले प्राण गमवावे लागले होते, तर २०१२ मध्ये जानेवारी ते सप्टेंबपर्यंत शहरात ३०२ जणांचा मृत्यू झाला. या अपघातांमध्ये अनेकदा अनियंत्रित वेग हे कारण असल्याचे दिसून आले आहे. मोटार वाहन कायदा १९८८ च्या कलम ११२ (लिमिट्स ऑफ स्पीड) नुसार हलकी वाहने व दुचाकींसाठी शहरात ताशी ५० किमी अशी मर्यादा आहे. मात्र, या वेगमर्यादेचे बऱ्याच वेळा पालन होताना दिसत नाही. शहरात बहुतांश रस्त्यांवर वेगमर्यादेपेक्षा जास्त वेगाने वाहने जाताना दिसून येतात. तरुणांकडून अनेक वेळेला भरधाव वेगाने वाहन चालल्याचे दिसून येते. ही वेगमर्यादा मोजण्यासाठी पोलिसांकडे ‘स्पीडगन’ नाही. त्यामुळे त्यांच्या समोरून भरधाव वाहन चालवत असले तरीही कारवाई करता येत नाही. गेल्या काही वर्षांत अशाच प्रकारची कोणतीच करावाई झालेली नाही.
याबाबत वाहतूक शाखेचे उपायुक्त विश्वास पांढरे यांनी सांगितले की, वेगमर्यादा मोजण्यासाठी लागणारे स्पीडगन उपकरण वाहतूक शाखेला मिळालेले नाही. २०१० साली याबाबत शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे. वेगमर्यादा दिसून आल्यास आपण त्यांच्यावर कारवाई करतो. मात्र, हे उपकरण नसल्यामुळे काही अडचणी येतात. त्याचबरोबर नो हॉर्न झोन कारवाई आपणही करू शकतो. आपल्याकडे असलेले मनुष्यबळ हे चौकात वाहतूक नियमनाचे काम करण्यातच जाते. त्यामुळे नो हॉर्न झोनची कारवाई करता येत नाही.      
‘नो हॉर्न झोन’ फक्त नावापुरतेच!
शहरात शाळा, महाविद्यालय, रुग्णालय, न्यायालय, शासकीय कार्यालय अशा अनेक ठिकाणी ‘नो हॉर्न झोन’ म्हणून घोषित करण्यात आली आहे. त्या ठिकाणी महापालिकेकडून नो हॉर्न झोनचे फलकही लावण्यात आले आहेत. मात्र, नो हॉर्न झोन हे फक्त नावापुरतेच आहेत. या भागात सर्रास हॉर्न वाजविले जातात. याकडे महापालिका व पर्यावरण विभाग दुर्लक्ष करत आहेत. नो हॉर्न झोनमध्ये हॉर्न वाजविणाऱ्यांवरही गेल्या काही वर्षांत कारवाई झालेली नाही. ही कारवाई करण्याचे काम महापालिका व पर्यावरण विभागाचे असते. त्याचबरोबर वाहतूक पोलीससुध्दा ही कारवाई करू शकतात.