गावातच सर्व प्रकारचे दाखले देण्यास प्रारंभ Print

प्रतिनिधी
सुवर्णजयंती राजस्व अभियानांतर्गत सर्व प्रकारचे दाखले गावातच देण्याच्या उपक्रमास जिल्हाधिकारी डॉ. संजीवकुमार यांच्या हस्ते वडगाव गुप्ता येथे सुरूवात करण्यात आली. किचकट पद्धतीने अशुद्ध लिखाणाचा दाखला घेण्याच्या कटकटीतून ग्रामीण भागातील नागरिकांची आता सुटका झाली असून राजस्व अभियानामुळेच हे शक्य झाले, असे यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
प्रांताधिकारी राजेंद्र पाटील, तहसीलदार राजेंद्र थोटे, सरपंच विक्रम शेवाळे, पंचायत समिती सदस्य राजेंद्र शेवाळे, माधवराव लामखडे, दत्ता सप्रे, अशोक शेवाळे, तलाठी अशोक गाडेकर, बबन डोंगरे, रंगनाथ गव्हाळे, पोपट शेवाळे, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत, प्रविण लाटणे, आनंद दळवी आदी यावेळी उपस्थित होते. नागरिकांचा वेळ व पैसा यातून वाचणार आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
या अभियानांतर्गत सात-बाराचा उतारा, शाळेतील विद्यार्थ्यांना जातीचे दाखले, शिधापत्रिका, उत्पनाचा दाखला, रहिवासाचा दाखला हे दाखले अर्ज केला की संगणकावर लगेचच काढून देण्यात येणार आहे. ऐनवेळी दाखल्यांसाठी धावाधाव न करता नागरिकांनी आपली गरज ओळखून आवश्यक असलेले दाखले आधीच काढून घ्यावेत, असे आवाहन यावेळी अधिकाऱ्यांनी केले.