गृहमंत्र्यांच्या आश्वासनानंतर दिघीत पोलीस चौकी सुरू Print

प्रतिनिधी
दिघी परिसरामध्ये शुभम शिर्के या विद्यार्थ्यांच्या खुनाची घटना घडल्यानंतर या भागात पोलीस चौकी सुरू करण्याबाबत गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दिलेल्या आश्वासनानुसार दिघीत पोलीस चौकी सुरू करण्यात आली आहे.
पिंपरी-चिंचवडच्या महापौर मोहिनी लांडे यांच्या हस्ते गुरुवारी चौकीचे उद्घाटन करण्यात आले. आमदार विलास लांडे, पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ, अप्पर पोलीस आयुक्त डॉ. सुरेशकुमार मेखला, वाहतूक शाखेचे उपायुक्त मनोज पाटील, नगरसेवक चंद्रकांत वाळके, अजित गव्हाणे, संजय वाबळे, आशा सुपे, माजी नगरसेवक दत्ता गायकवाड आदी त्या वेळी उपस्थित होते.
महापौर लांडे म्हणाल्या, शुभम शिर्के हत्याकांड झाल्यापासून या भागात पोलीस चौकीची मागणी करण्यात येत होती. या मागणीचा पाठपुरावा झाल्याने ही चौकी सुरू झाली. महिलांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी चौकीत महिला अधिकाऱ्याची नेमणूक व्हावी. आमदार लांडे म्हणाले की, या भागात चौकीसाठी गृहमंत्र्यांकडे मागणी केली होती. त्यांनी आश्वासन दिल्यानंतर त्याचा पाठपुरावा करून ही चौकी सुरू झाली. दिघीची लोकसंख्या ८० हजार आहे. डुडूळगाव, चऱ्होली मिळून एक ते सव्वालाख लोकसंख्या होते. त्यामुळे या भागात स्वतंत्र पोलीस ठाणे स्थापन झाले पाहिजे.