पिंपरी पालिकेला उशिराने जागच; आता डेंग्यूविषयक ‘जनजागृती’ Print

पिंपरी / प्रतिनिधी
डेंग्यू होण्यामागची कारणे, त्यासाठी घ्यावयाची काळजी व लागण झाल्यानंतरची उपाययोजना यासंदर्भात नागरिकांमध्ये जागृती करण्याचा व त्यासाठी येणाऱ्या खर्चास स्थायी समितीने गुरुवारी मान्यता दिली. पत्रके, होìडग, वर्तमानपत्रात जाहिराती, केबल आदींच्या माध्यमातून ही जनजागृती होणार आहे. ज्येष्ठ दिग्दर्शक यश चोप्रा यांचा डेंग्यूने मृत्यू झाल्यानंतर पालिकेला उशिराने जाग आली आहे.
स्थायी समितीचे अध्यक्ष जगदीश शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत जावेद शेख यांनी डेंग्यूचा विषय उपस्थित करून शहरभर डेंग्यूचे रुग्ण आढळत असल्याची बाब सदस्यांनी निदर्शनास आणली. मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद जगदाळे यांनी सदस्यांच्या विविध शंकांना उत्तरे दिली. आतापर्यंत चालू वर्षी ४६ डेंग्यूचे रुग्ण आढळून आले, याविषयी आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे. चारही प्रभागांत धुरीकरण करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, त्या उत्तराने सदस्यांचे समाधान झाले नाही. जगदाळे यांनी सांगितलेल्या आकडय़ापेक्षा कितीतरी अधिक डेंग्यूचे रुग्ण असल्याची माहिती सदस्यांनी पत्रकारांना दिली. स्थायी समितीत त्यावर जोरदार चर्चा झाल्यानंतर उशिरा का होईना पालिकेने जनजागृती करण्याचा निर्णय घेतला आहे.